नगर | अर्नथ टाळला; ऑक्सिजन पुरवठा तत्पुरता सुरळीत

रात्री उशिरा दोन टँकर मिळाले; प्रशासनाने रात्रीच केले वितरण

नगर (प्रतिनिधी) – शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून, केवळ दोन तास पुरेल एवढाच ऑक्सिजन काही हॉस्पिटलकडे शिल्लक होता. रात्री उशिरा दोन टँकर ऑक्सिजन उपलब्ध झाले. प्रशासनाने रात्रीच वितरण केले. मात्र, ऑक्सिजन मिळण्यासाठी वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, मंत्र्यांची रात्रभर फोनाफोनी सुरू होती.

जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट सक्रीय असून, दिवसेंदिवस रुग्ण संख्या मोठ्या प्रताणात वाढत आहे. सध्या जिल्ह्यात सुमारे वीस हजार रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील अनेक रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ आहे. अनेकांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नाही ही वस्तुस्थिती असताना खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन दोन तपास पुरेल इतकाच राहिला होता. 

त्यामुळे आयएमएच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. जिल्ह्याला दररोज 60 केएल ऑक्सिजन लागत असून, त्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा अत्यंत कमी होत आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन पुरविणार्‍या पाच अधिकृत एजन्सी आहेत. मात्र, एकाही एजन्सीकडे ऑक्सिजन शिल्लक नाही. त्यामुळे येत्या चार तासांनतर रुग्णांवर कसे उपचार करायचे असा प्रश्‍न खासगी हॉस्पिटलमधील रुग्णांना पडला होता.

दरम्यान, आयएमएच्या पदाधिकार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांनी रात्री उशिरापर्यंत दोन टँकर ऑक्सिजन येईल, असे आश्‍वासन दिले होते. तर, दोन हॉस्पिटलला तत्पुरता जिल्हा रुग्णालयातून ऑक्सिजन दिला होता. रात्री चाकण (जि. पुणे) येथून येणार्‍या ऑक्सिजन टँकरची डॉक्टरांसह सर्व प्रशासकीय अधिकारी वाट पाहत होते. त्यात शिक्रापूर येथे आरटीओंनी ऑक्सिजन घेऊन येणारा टँकर अडविला. 

त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांशी फोनवर बोलून टँकरची वाट मोकळी केली. त्यानंतर पुन्हा नगरमध्ये आल्यानंतर एका टँकरमध्ये बिघाड झाला. तो काही कार्यकर्ते व पोलिसांनी दुरूस्त केला. त्यानंतर रात्री उशिरा जिल्ह्याला दोन टँकरमधून 29 केएल ऑक्सिजन मिळाला. प्रशासकीय अधिकार्‍यांनी रात्रीच त्या ऑक्सिजनचे वितरण केले. 

त्यामुळे अनेक रुग्णालयातील अर्नथ टाळला. हा ऑक्सिजन आज रात्रभर पुरेल एवढाच आहे. पण, आज पुन्हा रात्री दोन टँकर ऑक्सिजन जिल्ह्याला मिळणार आहे, असे प्रशासकीय अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचा प्रश्‍न तत्पुरता सुटला आहे, असे म्हणता येईल.

काल ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. रात्री उशिरा दोन टँकर आल्याने काहीअंशी धोका टळला असून, तत्पुरता दिलासा मिळाला आहे. आज पुन्हा दोन टँकर ऑक्सिजन येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
– डॉ. सचिन वहाडणे, सचिव, आयएमए.

काल जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. परंतु, रात्री दोन टँकर ऑक्सिजन जिल्ह्याला मिळाला आहे. कोणत्याही हॉस्पिटलला ऑक्सिजन कमी पडणार नाही. आमचा चांगला समन्वय आहे. त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
– डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.