वैद्यकीय उपचारांसाठी ऑक्‍सिजन पुरवठा वाढणार

उत्पादकांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

पुणे – ऑक्‍सिजन उत्पादकांनी एकूण उत्पादनाच्या 80 टक्के ऑक्‍सिजन वैद्यकीय उपचारांसाठी, तर 20 टक्के ऑक्‍सिजन औद्योगिक उत्पादनासाठी उपलब्ध करून द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्‍सिजन उत्पादक व ऑक्‍सिजन सिलिंडर भरणारे उत्पादक व पुरवठादारांसोबत बैठक घेण्यात आली बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, ऑक्‍सिजन सिलिंडर भरणाऱ्या उत्पादकांनी त्यांच्याकडे भरण्यात आलेले सिलिंडर केवळ वैद्यकीय उपचारासाठी वितरीत करावेत. रुग्णालय व ऑक्‍सिजन सिलेंडर भरणाऱ्या छोट्या उत्पादकांपर्यंत टॅंकर जलदगतीने पोहोचवण्यासाठी द्रवरुपातील ऑक्‍सिजन टॅंकरच्या वाहतूक वितरणादरम्यानच्या त्रुटी उत्पादकांनी दूर कराव्यात व पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियोजन करावे. रुग्णालयांना पुरेसा ऑक्‍सिजन पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्‍वासनही उपस्थितांनी दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.