शेतकरी आंदोलनामुळे ऑक्‍सिजन पुरवठ्यात अडथळे? संयुक्त किसान मोर्चाने फेटाळला आरोप

नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीतील ऑक्‍सिजन पुरवठ्याच्या वाहतुकीत अडथळे येत असल्याचा आरोप भाजपचे खासदार परवेश वर्मा यांनी केला. मात्र, खोटा प्रचार अशा शब्दांत संयुक्त किसान मोर्चाने तो आरोप फेटाळून लावला.

वर्मा यांनी मंगळवारी रात्री एक ट्विट केले. दिल्लीतील काही रूग्णालयांशी संबंधित असलेल्यांशी माझे बोलणे झाले. आंदोलकांनी रस्ता रोखल्याने ऑक्‍सिजनची वाहतूक अवघड बनली आहे. आंदोलकांनी रस्ता खुला करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली, असे वर्मा यांनी म्हटले. तो आरोप खोडून काढण्याच्या उद्देशातून शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने एक निवेदन जारी केले.

आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून अत्यावश्‍यक सेवांसाठी आम्ही रस्ता खुला ठेवला आहे. आतापर्यंत एकही रूग्णवाहिका किंवा कुठलीही अत्यावश्‍यक सामग्री रोखण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांनी नव्हे; तर केंद्र सरकारने रस्त्यात अडथळे उभे केले आहेत. शेतकऱ्यांनी रस्ते रोखल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. केंद्र सरकारच्या कृषी धोरणांना आमचा विरोध आहे. करोनाबाधित, करोनायोद्धे किंवा सामान्य नागरिकांना आमचा विरोध नाही, असे त्या निवेदनात नमूद करण्यात आले. केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी जवळपास पाच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.