पुणे – राज्यात सध्या 80 टक्के ऑक्सिजन हा वैद्यकीय वापरासाठी तर 20 टक्के हा उद्योगांसाठी देण्याचे आदेश कंपन्यांना दिले होते. पण त्यात आता राज्य शासनाने बदल केला आहे. आता 100 टक्के ऑक्सिजन उत्पादन हे फक्त वैद्यकीय वापरासाठी देण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत.
करोना बाधितांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणी वाढू लागली आहे. करोना बाधितांची संख्या अशीच वाढू लागली तर ऑक्सिजनची मागणीत मोठी वाढ होईल, त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विविध शहरांतील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढतेय. अशावेळी रुग्णालयात बेड्स आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली आहे.
करोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. ऑक्सिजनच्या निर्मितीला वेळ आणि मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी आता फक्त वैद्यकीय गजरेसाठीच ऑक्सिजन उप्तादन करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
शासनाकडून दिलेल्या सूचना…
उत्पादक कंपन्यांनी पूर्ण क्षमतेने ऑक्सिजन उत्पादन करावे.
लस निर्माण करणाऱ्या कंपन्या आणि वैद्यकीय उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना ऑक्सिजन मिळणार
उर्वरित सर्व ऑक्सिजनचे उत्पादन हे फक्त रुग्णालयांना पुरविण्यात येणार.