पुणे – विभागात करोना रुग्णांच्या संख्या कमी होत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीत घट झाली आहे. मागील पाच महिन्यांच्या तुलनेत ऑस्किजनची मागणीत 70 टक्के म्हणजे 245 मेट्रिक टनने घट झाली आहे. तर पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी 66 टक्के म्हणजे 141 मेट्रिक टनने कमी झाली आहे.
सप्टेंबरदरम्यान शहरासह ग्रामीण भागात करोना बाधितांची संख्या मोठी होती. त्यामुळे ऑस्किजनच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. यामुळे तुटवडा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचे उत्पादक कंपन्यांना सध्याच्या उत्पादन क्षमतेच्या पाच पट उत्पादन वाढवण्याच्या सूचना विभागीय आयुक्त कार्यालयाने दिल्या होत्या.
यादरम्यान करोना सोबतच ऑस्किजनचे नवीन संकट उभे राहिले होते. मात्र, पुणे जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणली होती. याचवेळी एकूण उत्पादित 80 टक्के ऑक्सिजनचा वापर हा वैद्यकीय, तर 20 टक्के वापर हा औद्योगिक कारणासाठी होत आहे. यापूर्वी हे प्रमाण 30 टक्के वैद्यकीय कारणासाठी तर 70 टक्के औद्योगिक वापरासाठी वापरण्यात येत होता. आता मात्र परिस्थितीमध्ये सुधारणा होत असून ऑस्किजनची मागणी कमी होत आहे.
पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या तीन कंपन्या आहेत. तर 16 रिफिलिंग युनिट्स आहेत. सध्या विभागात 1 हजार 317 मे.टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे.