पुणे – महापालिकेच्या लायगुडे, खेडेकर, दळवी रूग्णालयात येत्या दहा दिवसांत शंभरहून अधिक ऑक्सिजन बेड्स उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी संबंधित हॉस्पिटलमध्ये प्रथमत: ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा उभी करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या सर्व रुग्णालयांतील प्रमुखांची तसेच आरोग्य अधिकाऱ्यांची सोमवारी अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यामध्ये समस्या सोडवण्याबरोबरच अधिकची बेड क्षमता वाढवण्याबाबत विचार करण्यात आला. यानुसार, महापालिकेच्याच माध्यमातून येत्या दहा-पंधरा दिवसांत धायरी येथील लायगुडे रुग्णालय-30, बोपोडी येथील खेडेकर रुग्णालयात 40 ऑक्सिजन बेड नव्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालयात येत्या दोन दिवसांत 50 ऑक्सिजन बेड्स कार्यरत होणार असून, सध्या येथे 30 ऑक्सिजन बेड्स आणि 10 व्हेंटिलेटर बेड्स आहेत.
बाणेर कोविड हॉस्पिटल येथे टप्प्याटप्प्यानेच वैद्यकीय सेवांची क्षमता लक्षात घेऊन बेड्स वाढवण्यात येत आहेत. रविवारी येथे 10 ऑक्सिजन बेड नव्याने सुरू करण्यात आले असून, येत्या दोन दिवसांत आणखी 35 ऑक्सिजन बेडची क्षमता वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे 314 बेड्सची क्षमता असलेले हे कोविड हॉस्पिटल 100 बेडच्या क्षमतेने सुरू राहील, असेही अग्रवाल यांनी नमूद केले.