कोविड केअर सेंटरमध्येही ऑक्‍सिजन बेड; पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासन सतर्क

रुग्णांना तात्काळ ऑक्‍सिजन देण्यासाठी प्रयत्न

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दररोज अडीच हजार नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांतील बेड अपुरे पडत आहे. करोनाची लागण झालेल्या मात्र कमी तीव्रतेची लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येते. मात्र, काही रुग्णांची प्रकृती अचानक बिघडल्यास ऑक्‍सिजन बेडसाठी त्यांना तेथून हलवावे लागते. त्यामध्ये रुग्णाची प्रकृती आणखी खालावते. असे होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्‍सिजन बेड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोविड केअर सेंटरमधील रुग्णांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना वायसीएम किंवा शहरातील इतर खासगी रुग्णालयामध्ये दाखल करावे लागते. रुग्णालयामध्ये ऑक्‍सिजन बेड उपलब्ध होईपर्यंत त्यांना त्याच अवस्थेत ठेवण्याची वेळ येते. कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करतेवेळी काही जणांना ऑक्‍सिजनची आवश्‍यकता असते. अशा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्येच ऑक्‍सिजन उपल्बध झाल्यास पुढील गुंतागुंतीची परिस्थिती टाळता येणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत रुग्णांना तातडीने ऑक्‍सिजन बेड उपलब्ध होण्यासाठी कोविड केअर सेंटरमधील काही बेडस ऑक्‍सिजन बेड करण्यात येणार आहे.

भोसरीतील बालनगरीमधील 10 बेड, बालेवाडीतील क्रीडा संकुलातील 6 व घरकुल येथील 6 बेड ऑक्‍सिजन बेड करण्यात येणार आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटरमधील एखाद्या रुग्णांची प्रकृती खालावली तरी त्याला आयसीयू उपलब्ध होईपर्यंत ऑक्‍सिजन पुरवठा करता येणार आहे. यामुळे रुग्णांची स्थिती खालावणार नाही. यासाठी वायसीएम रुग्णालयातील जम्बो ऑक्‍सिजन सिलेंडर संपूर्ण ऍक्‍सेसरीजसह तीनही कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध करण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आदेश दिले आहेत.

तसेच याठिकाणी सिलेंडर बसवून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. शहरातील वाढती रुग्णसंख्या व गंभीर रुग्णांचे प्रमाण लक्षात घेत आयुक्त पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बालनगरी, बालेवाडी व घरकुल येथील कोविड केअर सेंटरमध्ये 22 ऑक्‍सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आणखी 50 व्हेंटिलेटर कार्यान्वित करणार
महापालिकेच्या वतीने रुग्णालयांमध्ये आणखी 50 व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. येत्या चार दिवसांमध्ये याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तर डी वाय पाटील रुग्णालयामध्ये 300 ऑक्‍सिजन बेड व 20 व्हेंटिलेटरची सुविधा करण्यात येणार आहे. तसेच पुढील काही दिवसांमध्ये आकुर्डी, भोसरी व जिजामाता रुग्णालयामध्ये 300 ऑक्‍सिजन बेड कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर बेडची क्षमता वाढविण्यात येणार आहे. कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्‍सिजन बेडची सुविधा करण्यात येणार आहे. त्यामुळे तेथील रुग्णांना पुढील सुविधा उपलब्ध होईपर्यंत ऑक्‍सिजनचा पुरवठा करता येईल. यामुळे गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी करणे शक्‍य होईल. शहरातील वाढत्या रुग्णांचा विचार करून त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनीही नियम पाळून सहकार्य करावे.
– राजेश पाटील, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.