लंडन- करोना विषाणूविरोधात ऑक्सफर्ड विद्यापिठाने तयार केलेल्या औषधामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला उत्तेजन दिले जाते आणि या औषधाचा कोणताही धोका नसल्याचे संकेत मिळत असल्याचे शास्त्रज्ञांनी सोमवारी जाहीर केले. या औषधाच्या मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यानंतर हे सकारात्मक संकेत दिले गेले आहेत. करोनाच्या उपचार प्रक्रियेतील ही मोठी सकारात्मक बाब आहे.
क्लिनिकल चाचणीच्या भाग म्हणून एप्रिल ते मे या कालावधीत 18 ते 55 वयोगटातील 1,077 निरोगी प्रौढांना या लसीचे डोस देण्यात आले होते. त्या चाचणीचा निष्कर्श लॅन्सेट मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला.
लस दिल्यानंतर 56 दिवसांपर्यंत त्यांच्या शरीरात तीव्र ऍन्टीबॉडी आणि टी-सेल प्रतिकारक शक्ती प्रेरित केल्याचे परिणाम दिसून आले. विषाणूंपासून कित्येक वर्षांपर्यंतच्या संरक्षण कायम टिकवण्यासाठी टी-सेल अतिशय महत्वाच्या असतात. हे निष्कर्श निश्चितच आशादायक आहेत. मात्र तज्ञांच्या म्हणण्यानुसार ही लस दीर्घकाळासाठी उपयोगी आहे की नाही याबाबत आताच सांगता येऊ शकणार आही. त्यासाठीच्या व्यापक चाचण्या सध्या सुरू आहेत.
या लसीचा करोना विषाणूच्या साथीवर परिणाम होऊ शकेल की नाही हे ठामपणे सांगण्यापूर्वी अजून बरेच काम बाकी आहे, असे या शोधनिबंधाच्या सह-लेखिका प्रोफेसर सारा गिलबर्ट यांनी म्हटले आहे.
या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये या विषाणूच्या प्रतिक्रियेबाबत अधिक माहिती मिळू शकेल. जर हे औषध त्यावर परिणामकारक असेल, तर त्याचे व्यापक उत्पादन केले जाऊ शकेल. असेही गिलबर्ट यांनी म्हटले आहे.
करोनावरील औषधाचा ब्रिटनमधील कंपनीकडून दावा करोनावरील औषधाच्या वैद्यकीय चाचणीमधून सकारात्मक निष्कर्श मिळाले असल्याचा दावा ब्रिटनमधील एका औषध कंपनीने केला आहे. करोना विषाणूवर प्रोटीन आधारीत औषध विकसित केले असल्याचे सिनायर्गेन या कंपनीने म्हटले आहे.
“एसएनजी 001′ असे नाव या औषधाला दिले गेले आहे. त्यात इंटरफेरोन बीटा नावाच्या प्रोटीनचा वापर केला गेला आहे. शरीरात विषाणूचा संसर्ग झाल्यावर मानवी शरीरात हे प्रोटीन उत्पन्न होते. कंपनीने तयार केलेल्या औषधामध्ये हे प्रोटीन असल्यामुळे हे औषध नेब्युलायजरच्या माध्यमातून हुंगल्यास थेट फुफुसांमध्ये जाऊ शकते.
त्यामुळे फुफुसांना प्रतिसाद देण्यास उत्तेजन मिळू शकते. गंभीर अवस्थेत असलेल्या कोविड रुग्णांवरील परिणामकारक उपचार म्हणून या औषधाचा उपयोग होऊ शकतो. असे सिनायर्गेनचे सीईओ रिचर्ड मार्सडेन म्हणाले.