Oxfam’s Report on Colonialism: ब्रिटिशांनी भारतावर जवळपास 150 वर्ष राज्य केले. या दीडशे वर्षांच्या राजवटीत समृद्ध अशा भारताची अर्थव्यवस्था रसातळाला पोहोचली होती. वारंवार पडणारे दुष्काळ, उद्योगधंदे नष्ट होणे, शेतीचा ऱ्हास अशा अनेक कारणांमुळे भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी तर झालीच. मात्र, ब्रिटिशांनी त्यांच्या राजवटीतून प्रचंड पैसा त्यांच्या देशात नेला. नुकताच, ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या अहवालात याबाबत दावा करण्यात आला आहे.
ऑक्सफॅमच्या अहवालानुसार, इंग्रजांनी 1765 ते 1900 या काळात भारतातून तब्बल 64.82 ट्रिलियन डॉलर एवढ्या प्रचंड संपत्तीची लूट केली. म्हणजे या काळात ब्रिटिशांनी भारतातून तब्बल 5611 लाख कोटी रुपयांची लूट केली. भारतातून लुटण्यात आलेल्या या रक्कमेपैकी 33.8 ट्रिलियन डॉलर एवढी रक्कम ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत 10 टक्के लोकांमध्ये वाटण्यात आली.
सर्वात श्रीमंत लोकांपाठोपाठ वसाहतवादाचा सर्वाधिक फायदा नव्या मध्यमवर्गास झाला. सर्वात श्रीमंत 10 टक्के लोकांना लुटण्यात आलेल्या पैशातील 52 टक्के हिस्सा मिळाला. त्यापाठोपाठ मध्यमवर्गीयांना 32 टक्के लूट मिळाली.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीपूर्वी दरवर्षी ऑक्सफॅम इंटरनॅशनलकडून अहवाल जारी केला जातो. यावर्षीच्या अहवालाचे शीर्षक ‘टेकर्स, नॉट मेकर्स’ असे आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे की, वसाहतवादाने एक असमान जग निर्माण केले. ज्यामुळे सर्वात श्रीमंत लोकांना सातत्याने फायदा झाला. विकसित देशांतील श्रीमंतांना फायदा होण्यासाठी गरीब देशांमधून संपत्ती काढून घेण्यात आली.
या अहवालात दावा करण्यात आला आहे की, ब्रिटिश राजवटीच्या काळात भारताच्या औद्योगिक उत्पादनावर परिणाम झाला. 1750 मध्ये जागतिक औद्योगिक उत्पादनात भारताचा वाटा 25 टक्के होता. मात्र, 1900 पर्यंत हा वाटा केवळ 2 टक्क्यांवर आला.