पुणे – हॉटेल अशोकाच्या मालकाने त्याच्या सराईत गुन्हेगार भाच्याला हॉटेल गारवाचे मालक आखाडेंच्या खुनाची सुपारी दिली. व्यवसायाच्या स्पर्धेतून ही सुपारी दिली गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.
बाळासाहेब खेडेकर (56), निखील खेडेकर (24), सौरभ ऊर्फ चिम्या चौधरी (21), अक्षय दाभाडे (27) करण खडसे (21), प्रथमेश कोलते (23), गणेश साने (20) आणि निखील चौधरी (20, सर्व रा. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रामदास आखाडे (38, रा. दौंड) असे मृत्यू झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे.
बाळासाहेब खेडेकर व मुलगा निखीलचे अशोका नावाचे हॉटेल आखाडे यांच्या गारवा हॉटेलशेजारी आहे. आखाडे यांच्या हॉटेलमुळे खेडेकर यांच्या हॉटेलचा व्यवसाय होत नव्हता. त्यामुळे बाळासाहेब याने भाचा सौरभ चौधरी याला आखाडे यांचा खून करण्यास सांगितले. तसे केल्यास दररोज एक ते दोन हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार चौधरी याने त्याचा साथीदार नीलेश आरते व इतर साथीदारांच्या मदतीने आखाडे यांचा खून केल्याची माहिती गुरुवारी सरकारी वकील संजय दीक्षित यांनी न्यायालयास दिली. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींनी 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी ऍड. दीक्षित यांनी केली. न्यायालयाने आरोपींना 26 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
तर अशोकाचा तीन लाखांचा व्यवसाय होईल…
गारवाचा रोजचा गल्ला दोन ते अडीच लाख रुपये तर अशोकाचा साधारण 50 ते 60 हजार रुपये होता. गारवा हॉटेल बंद असते त्यादिवशी अशोकाचा व्यवसाय अडीच ते तीन लाख रुपयांचा होत असे. त्यामुळे गारवा कायमचे बंद पडले तर आपला व्यवसाय वाढेल या विचाराने आरोपींनी खुनाचा कट केल्याचे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.