मालकीची कार आणि ओला-उबरच्या सेवेचे गणित

नागरिक आता ओला-उबर कंपन्यांच्या टॅक्‍सी सेवेला प्राधान्य देत असल्याने वाहन उद्योगाच्या वाढीचा वेग कमी झाल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आणि या विषयावर उलटसुलट चर्चा सुरु झाली. खरोखरच स्वतःची कार घेणे आणि कार घेण्याचे टाळून ओला-उबर सेवेचा वापर करणे यामागील गणित काय सांगते?

समजा एक व्यक्ती पुण्यात नोकरी करते आणि त्यासाठी रोज तिला वीस किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. आता त्या व्यक्तीने त्यासाठी कार खरेदी केली तर त्याचा खर्च काय येतो ते पाहू. समजा त्या व्यक्तीने 2014 मध्ये हॅचबॅक श्रेणीतील कार खरेदी केली. कारची किंमत सात लाख रुपये होती आणि त्यासाठी त्याने बचत करून साठवलेले 2 लाख रुपये डाऊनपेमेंट म्हणून दिले आणि 5 लाखांचे कर्ज घेतले. हे कर्ज त्याला पाच वर्षांत फेडावे लागणार होते. कर्जावर 9 टक्के व्याज गृहित धरले तर व्याजाची रक्कम 1.23 लाख रुपये होते. त्यामुळे त्याला प्रत्यक्षात ती कार 8.23 लाख रुपयांना पडते. 2019 मध्ये त्याने ती कार विकायला काढली तर ती 3 लाखांना विकली जाईल. गाडीची कंडीशन चांगली असेल तर. म्हणजेच चार वर्षांत त्याला कारच्या मालकीपोटी आलेला खर्च 5.23 लाख रुपये असेल.

याखेरीज या पाच वर्षांच्या कालावधीत कारच्या विम्यापोटी 75,000 हजार रुपये, देखभालीचा वार्षिक खर्च 10,000 रुपये असेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कारसाठी लागणाऱ्या इंधनावरील खर्च. शहरातील वाहतुकीचा वेग आणि रस्त्यांची स्थिती लक्षात घेता असे गृहित धरू की, कार लिटरला 10 किलोमीटर अंतर धावते. रोजचा किमान 25 किलोमीटरचा प्रवास गृहित धरला तर महिन्याचे 700 किलोमीटर होतात आणि त्यासाठी पेट्रोलचा भाव सरासरी 70 रूपये लिटर असेल तर पाच वर्षांत पेट्रोलसाठी 2.94 लाख रुपये लागतात. त्याखेरीज पार्किंग शुल्क, टोल, सोसायटीत रोज गाडी स्वच्छ करण्याऱ्याला द्यावे लागणारे शुल्क असा पाच वर्षांतील खर्च आपण 15,000 रुपये धरू. यासगळ्याची बेरीज केली तर पाच वर्षात 9,57,000 रुपये खर्च येतो.

समजा ड्रायव्हर ठेवला तर त्याचा मासिक पगार किमान 15,000 रुपये पकडला तर खर्च आणखी वाढतो. या सगळ्या शक्‍यता गृहित धरून मालकीची कार बाळगण्याचा खर्च 23 ते 42 रूपये प्रति किलोमीटर एवढा येतो.त्या तुलनेत ओला-उबरची सेवा जास्तीत जास्त वीस रुपये प्रतिकिलोमीटर भाड्याने उपलब्ध आहे. पुन्हा फ्रिक्वेंट रायडर्सचा डिस्काऊंट लक्षात घेतला तर हा खर्च आणखी कमी होतो. त्याचबरोबर ओला-उबरची कार असली की पार्किंगची अजिबात डोकेदुखी नसते की, वाहतुकीच्या गर्दीत आणि कोंडीत वाहन चालवताना येणारा मानसिक ताणही नसतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)