लखनऊ – बिहारमध्ये विधानसभेच्या पाच जागा जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या असदुद्दीन ओवैसी यांनी आता आपलं लक्ष उत्तर प्रदेशवर केंद्रीत केलं आहे. समाजवादी पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या आजमगडचा त्यांनी दौरा केला. या दरम्यान त्यांनी अखिलेश यादव यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
ओवैसी म्हणाले की, “कुणी काहीही म्हणो, आम्ही या ठिकाणी पूर्ण ताकदीने लढणार आहोत. आम्हाला भाजपची बी टीम म्हणणारे घाबरले आहेत. त्यांना वाटणारी भिती हाच आमचा विजय आहे.” आजमगड हा समाजवादी पक्षाचा गड मानला जातोय.
या ठिकाणाहून समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव लोकसभेवर निवडून गेले होते. आजमगडमध्ये मुस्लिमांची संख्या मोठी असून या ठिकाणच्या मुस्लिम मतांच्या दिशेवरुनच पूर्व उत्तर प्रदेशातील मुस्लिम मतांची दिशा ठरते असं म्हटलं जातं.
असदुद्दीन ओवैसी हे केवळ आठच तास या भागाच्या दौऱ्यावर होते. पण त्यांच्या या दौऱ्याने उत्तर प्रदेशचे राजकारण तापलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका लक्षात घेता या भागातल्या मुस्लिम मतांवर औवेसींची नजर आहे. या ठिकाणी औवेसींनी कोणतेही भाषण दिलं नाही पण त्यांना जो राजकीय संदेश द्यायचा होता तो त्यांनी दिल्याचं सांगण्यात येतंय.
उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक पुढच्या वर्षी होणार आहे. एकूण 403 सदस्यांची संख्या असणाऱ्या विधानसभेत भाजपचे बहूमत आहे. योगी आदित्यनाथ यांचे नेतृत्व हे आक्रमक हिंदुत्ववादी स्वरुपाचे आहे. त्यामुळे मुस्लिम मतांचे ध्रृवीकरण करण्यावर औवेसी यांचा भर असल्याचं सांगण्यात येतंय.
पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक मतदारसंघात मुस्लिम मतांची संख्या ही 20 ते 40 टक्के इतकी आहे. आतापर्यंत ही मते समाजवादी पक्षाच्या पारड्यात पडायची. आता या मतांवर असदुद्दीन ओवैसी यांची नजर आहे. त्यामुळे या परिसरावर औवेसी यांनी लक्ष केंद्रीत केल्याचं सांगण्यात येतंय.
प. बंगालमध्येही लवकरच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीवरही ओवैसी यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. या राज्यातील बहुतेक मतदारसंघांत मुस्लिम मते निर्णायक ठरतात. या मतांवर तृणमूल कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि डाव्यांचाही डोळा असतो. किंबहुना मुस्लिम समुदाय या तीन पक्षांपैकी जो पक्ष जेथे बलशाली असेल तेथे त्याचा समर्थक राहीला आहे.
मात्र आता ओवैसी यांनी रिंगणात उडी घेतल्यामुळे तेथील राजकीय गणितेही बदलण्याची शक्यता आहे. ओवैसी यांचा पक्ष याच मतांमध्ये वाटा घेणार असल्यामुळे ते भाजपच्या पथ्यावर पडते व त्यामुळेच ओवैसी यांना भाजपची बी टीम म्हणून हिणवले जाते आहे.