पाटणा – एमआयएम पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी अन्य छोट्या पक्षांना एकत्र घेऊन बिहारमध्ये एक नवीनच राजकीय आघाडी उघडली आहे.
ग्रॅंड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट असे या आघाडीचे नाव आहे. या आघाडीत मायावती यांचा बहुजन समाज पक्ष, सुहेलदेव समाज पार्टी, सामाजिक जनता दल, जनतांत्रिक पार्टी, या पक्षांचा समावेश आहे.
यादव आणि ओवैसी यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली. ते म्हणाले की, बिहार मधील जनता एनडीए आणि महाआघाडी या दोन आघाड्यांच्या राजकारणाला कंटाळली आहे.
त्यांना विधायक प्रतिसाद देण्यासाठी म्हणून आम्ही ही आघाडी स्थापन केली आहे. उपेंद्र कुशवाह हे या आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहेत.