कृषक | भारतीय फळांची परदेश वारी!

– विनय खरे

भारतीय फळांची परदेश वारी करोना काळात आधार ठरेल. याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेवरील ताण हलका होण्यास होईल.

आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार करता आपला देश आयात अधिक करत असल्याने त्याचे मूल्य डॉलरमध्ये चुकवावे लागते. तुलनेत आपली निर्यात कमी असल्याने देशाला डॉलरचे चलन कमी मिळते. हे लक्षात घेतले म्हणजे बाहेर देशाला निर्यात झालेल्या मालाचे महत्त्व समजून येईल. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याचा घोलवड चिकू साता समुद्रापार ब्रिटनमध्ये गेला. तसं पाहिलं तर चिकूच्या अनेक जाती आहेत. मात्र ज्या प्रजातीला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले त्या डहाणू घोलवड चिकूची निर्यात झाली. याचे जीआय प्रमाणिकरण महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाकडे आहे. हा चिकू त्याचा गोडवा, दर्जेदार स्वादासाठी ओळखला जातो. कॅल्शियम समृद्ध मातीमुळे अद्वितीय स्वाद यात निर्माण होतो.

या चिकूला कर्नाटक, गुजरात, प. बंगाल, तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्पादित केले जाते. कर्नाटकात याची उत्पादकता अधिक असून नंतर महाराष्ट्राचा क्रम लागतो. याचा वापर फ्रुट सॅलड, चटणी, जॅम तसेच दूध-दह्यात घालून खाण्यासाठी केला जातो. मे महिन्याच्या प्रारंभी आंध्र प्रदेशातील कृष्णा आणि चितोड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अडीच मेट्रिक टन जीआय प्रमाणित बंगनपल्ली आणि सुवर्णरेखा या जातीच्या आंब्याची एक खेप द. कोरियाला निर्यात करण्यात आली. या आंब्याला तिरुपती येथील एपिडा पुरस्कृत केंद्रात स्वच्छ आणि वेष्टनात घालून इफको किसान एसइझेड मार्फत निर्यात करण्यात आली. आताच्या हंगामासाठी 66 मेट्रिक टन आंबा पुरवठा करार केला आहे.

त्रिपुराचा फणस लंडनला

देशाच्या ईशान्येकडील राज्यांना सोबत घेऊन प्रगतीचा मार्ग खुला करण्याचा मोदी सरकारने प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी कृषी आणि प्रक्रियाकृत मालाची निर्यात क्षमता वाढवण्यावर भर दिला आहे. त्याचा एक भाग म्हणून नुकतीच 1.2 मेट्रिक टन फणसाची निर्यात लंडनला करण्यात आली. त्रिपुरा येथील कृषी संयोग ऍग्रो कंपनीने याची खरेदी करून एपिडा मान्यताप्राप्त कैगा एक्‍सिम मार्फत निर्यात केली. युरोपिय संघासाठी निर्यात करण्यास मे महिन्यात या संस्थेला मान्यता देण्यात आली होती. सेंद्रिय उत्पादन निर्यातीला चालना देण्यासाठीचा एक भाग म्हणून ग्लूटेनमुक्‍त सेंद्रिय फणस पावडर, वेष्टनकृत फणस क्‍यूब्स जर्मनीत पाठवण्यात आले. 10.20 टन इतका माल बंगळुरूच्या फलादा ऍग्रो रिसर्च फाउंडेशनतर्फे गेला. हा समूह औषधी नि सुगंधी जडी बुटी, नारळ, फणस, मसाले, कॉफी, आमरस आदींचे उत्पादन देखील घेतो.

लाल तांदूळ गेला अमेरिकेत

लोहयुक्‍त लाल तांदळाची पहिली खेप आसामातून अमेरिकेला पाठवण्यात आली. ब्रह्मपुत्रा खोऱ्यात कोणत्याही रासायनिक खताशिवाय तयार होणाऱ्या या जातीच्या तांदळाला “बाओ-धान’ असेही म्हटले जाते, जो आसामी जेवणाचा हिस्सा आहे. या तांदळात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने तो लाल दिसतो.

बिहारी लिची

जीआय प्रमाणित बिहारी लिची ब्रिटनला हवाई मार्गे पोहचली असून पाटणा येथील केंद्रातून ती पठावण्यात आली. बिहारच्या मुजफ्फरपूर येथील शेतकरी वर्गाकडून सिरा एंटरप्राइजने ती निर्यात केली, तर लंडनच्या एच अँड जे वेजने ती मागवली आहे. लिची या फळाचा टिकाऊपणा कमी कालावधीचा असल्याने प्रक्रियाकृत नि अन्य उत्पादनाचा विचार निर्यातीसाठी करण्याची गरज राज्याचे कृषी मुख्य सचिव एन. सर्वणकुमार यांनी सांगितलं. जर्दाळू आंबा, कातरणी तांदूळ, मघाई पान यानंतर 2018 साली जीआय मानांकन मिळवणारे लिची हे चौथे कृषी उत्पादन आहे.

येथील वैशाली, चंपारण्य, बेगूसराय, समस्तीपूर, मुजफ्फरपूर जिल्ह्यांच्या परिसरात लिची बाग लागवडीसाठी अनुकूल वातावरण आहे. चीननंतर भारत हा जगात दुसरा देश आहे जो मोठ्या प्रमाणावर लिची उत्पादन घेतो. लिचीचा पारदर्शक स्वादिष्ट गर आवडीचा असून हे फळ “टेबल फ्रुट’ म्हणून लोकप्रिय आहे. तर जलपान नि चीनमध्ये सुख्या किंवा डबाबंद प्रकारात पसंद केले जाते. फळ लागवडीत बिहार अव्वलस्थानी आहे. बिहार सरकारने विविध कृषी खाद्य प्रक्रिया नि उत्पादनाना प्रोत्साहन देण्यासाठी रोड मॅप तयार करण्यास घेतला आहे. यात मखाना (कमळ बी), आंबा, अन्य फळे नि भाज्या यांचा समावेश आहे.

व्हिलेज राइस येमेनमध्ये

तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात कुंभकोणममधील पेटंटप्राप्त “व्हिलेज राइस’चे साडेचार टन मालाच्या दोन खेपा येमेन आणि घाणा या देशात हवाई नि समुद्री मार्गे पाठवण्यात आल्या. प्रोटीन, फायबर आणि पौष्टिक गुणांनी युक्‍त या तांदळास थेट स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आले ज्याला इथे “राइस बाउल’ म्हणून ओळखले जाते. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत वृद्धी झाली असून यंदाच्या मार्च अखेरीस 35 हजार 448 कोटी रुपये तर मार्च 2020 अखेर ही निर्यात 14 हजार 400 कोटी रुपये अशी होती. ही वाढ रुपयात 146 टक्‍के तर डॉलरमध्ये 137 टक्‍के आहे. मे सुरुवातीस ओडिशा पारादीप आंतरराष्ट्रीय बंदरातून तांदळाची पहिली खेप निर्यात करण्यात आली. तर मार्च महिन्यात आसाममधून “लाल चावल’ अमेरिकेत गेला.

एकूणच आताच्या काळात दर्जेदार कृषी माल विविध देशांना पाठवण्याची नि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या शेतमालाची मोहोर उमटवण्याची संधी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.