कामशेत उड्डाणपुलाच्या कामास ‘ओव्हरहेड लाइन’चा अडथळा

पुलाचे काम आणखी चार महिने लांबण्याची शक्‍यता

कामशेत – कामशेत गावच्या हद्दीतील पुणे-मुंबई महामार्गावर सुरू असणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामास रेल्वेच्या इलक्‍ट्रिक ओव्हरहेड लाईनचा अडथळा येत असल्याने पुलाचे काम आणखी चार महिने लांबण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

कामशेत हद्दीतील पुणे-मुंबई महामार्गावर गेल्या तीन वर्षांपासून सुरू असणारे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता पुलाच्या वरून जाणाऱ्या रेल्वेच्या इलक्‍ट्रिक ओव्हरहेड लाइनमुळे पुलाच्या मुंबई बाजूच्या भरावाच्या कामास अडथला निर्माण होत असल्याने पुलाच्या मुंबई बाजूचे काम रखडले आहे.

उड्डाणपुलावरून जाणारी रेल्वेची ही ओव्हरहेड लाइन काढून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रेल्वेस मागील वर्षी दोन कोटी रुपये भरले होते, मात्र रेल्वे विभागाने अद्याप देखील या रेल्वेच्या इलक्‍ट्रिक ओव्हरहेड लाइनची उंची वाढविली नाही किंवा काढून घेतलेली नाही.

या उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या ठेकेदारास तीन वेळा मुदतवाढ देऊन देखील वेळेत काम पूर्ण करता न आल्याने एमएसआरडीसीकडून पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदारास पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत प्रतीदिन 42 हजार पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. आता ठेकेदाराने उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्यात आणलेले असताना देखील रेल्वेच्या इलक्‍ट्रिक ओव्हरहेड लाइनच्या अडथळ्यामुळे होणाऱ्या दिरंगाईचा भुर्दंड ठेकेदारास बसणार आहे.

यासंदर्भात रेल्वेच्या अभियंत्यांना विचारले असता इलक्‍ट्रिक ओव्हर हेड लाइनचे काम पूर्ण होण्यास अजून किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे पुलाचे काम पूर्ण होण्यास कामशेत मधील नागरिकांना जून महिन्याची वाट पहावी लागणार आहे.

इलेक्‍ट्रिक ओव्हरहेड लाइन काढून अजून उंचीवर घेण्यासाठी त्याठिकाणी मोठे टॉवर उभारावे लागणार आहेत. एका टॉवरसाठी 225 चौरसमीटर इतकी जागा लागणार आहे. जागा उपलब्ध होत नसल्याने कामास अडथळा निर्माण होत आहे.
– जवाहर गेंगले, अभियंता, रेल्वे विभाग.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.