चित्रपट – सिक्वेलचा भडीमार

सोनम परब 

बॉलिवूडमध्ये 1990 च्या दशकात महेश भट्टचा “सडक’ सुपरडुपर ठरला होता. या मसालेदार चित्रपटातील ऍक्‍शन, ड्रामा, रोमान्स, संगीताने तिकीटबारीवर धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट यशस्वी ठरल्याने महेश भट्टची कन्या पूजा भट्टचा देखील करियर ग्राफ उंचावला गेला. आता या चित्रपटाचा सिक्‍वेल लवकरच येत आहे. महेश भट यांच्याकडून आपली लहान कन्या आलिया भट्टसाठी सडक-2 ची निर्मिती केली जात आहे. बॉलीवूडमध्ये काही महिन्यांनंतर सिक्‍वेल चित्रपटाचा पूर येणार आहे आणि यात “सडक-2′ ने आघाडी घेतली आहे. सडक-2 मध्ये आलिया आणि आदित्य रॉय कपूर असून हा चित्रपट प्रेमकहाणीवर आधारित असणार आहे. भट्ट यांनी 1990 च्या दशकात एकाहून एक चित्रपट बॉलीवूडला दिलेले आहेत. असे असताना बऱ्याच वर्षांनंतर कमबॅक करताना नवीन स्टोरी घेऊन येण्यापेक्षा सडक चित्रपटाचाच सिक्‍वेल करण्यास त्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसते. ट्रेंड पंडित आमोद मेहरा यांच्या मते, अनेक निर्मात्याप्रमाणेच हा एक सेफ साइड गेम आहे.

अलीकडे दबंग-2, एबीसीडी-2, स्ट्रिट डान्सर, हाऊसफुल्ल-4, सिंघम-3, आशिकी-3, क्रिश-4, सूर्यवंशी, फिर हेराफेरी यासारख्या सिक्‍वेलपटांनी चांगले यश मिळवल्याने ज्येष्ठ निर्मातेदेखील यात नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. एकुणात सिक्‍वेलसाठी निर्मात्यांची स्पर्धा लागली आहे. आजच्या घडीला एखादा चित्रपट हिट ठरला की त्याचा सिक्‍वेल करण्याची तयारी केली जाते. मागच्या हिटवर पुढचेही चित्रपट तिकीटबारीवर चांगले यश मिळवतील, असा कयास निर्माते बांधत आहेत. दुसरीकडे श्रोतेही या सिक्‍वेलवरून संभ्रमात सापडतात. मागच्या चित्रपटा- प्रमाणेच हा चित्रपटदेखील मनोरंजक असेल, असे गृहित धरतात.

यादरम्यान निर्माते आणि दिग्दर्शक हेदेखील आपला सिक्‍वेल श्रोते सुपरहिट करतील, असे आडाखे बांधत असतात. बहुतांश निर्माते हे बाजाराची स्थिती पाहूनच अशा प्रकारच्या प्रोजेक्‍टची घोषणा करत असतात. यामुळे अनेकांना प्रोजेक्‍ट समजून सांगण्यासाठी अधिक वेळ देण्याची गरज भासत नाहीत. सिक्‍वेलची घोषणा केल्यानंतर लगेचच हा हिट चित्रपटाचा सिक्‍वेल असल्याचे सांगितले जाते आणि नवा चित्रपटही हाऊस फुल्ल ठरेल, असे कयास बांधले जातात. मात्र “रेस’ आणि “हाऊसफुल्ल’च्या सिरीजमधील अगोदरच्या चित्रपटाचा अनुभव फार चांगला नव्हता.

किती दिवस हाऊसफुल्ल?                                                                                              सिक्‍वेलची निर्मिती करताना पटकथेचा देखील प्रश्‍न येतो. अनेक चित्रपटातील पटकथा चांगल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. आता “सडक’मध्ये आलेले दिग्दर्शक आपला सामान्य चित्रपट टॉम डिक हॅरीच्या पटकथेत काय कमाल दाखवतील, याची श्रोत्यांना उत्सुकता आहे. याचप्रमाणे साजिद नाडियावालाच्या मानगुटीवरून हाऊसफुल्लचे भूत कधी उतरणार आहे कोणास ठाऊक. पहिल्या हाऊसफुलने शंभर कोटींचा व्यवसाय केला होता. तेव्हा तो खूपच उत्साहित झाला होता. त्यानंतर हाऊसफुल-2 ने शंभर कोटी नाही मात्र बऱ्यापैकी व्यवसाय केला. यामुळे साजिदचा सिक्‍वेल बनविण्याचा उत्साह कायम राहिला.

हाऊसफुल-3 मध्ये त्याने अक्षयकुमारचा आवडता लेखक-दिग्दर्शक साजिद फरहादला घेतले. मात्र, यावेळी 50 कोटींच्या चित्रपटाने 80 कोटींचा व्यवसाय केला. या कमाईने साजिद पुन्हा खूश झाला; परंतु हाऊसफुलच्या वेळी त्याला आलेले अनुभव पाहता सिक्‍वेलपेक्षा दुसरे प्रोजेक्‍ट बरे म्हणण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. असे असले तरी याच दिग्दर्शकांबरोबर हाऊसफुल-4 ची निर्मिती करणार आहे.

1990 च्या काळात विनोदी चित्रपटांची मेजवानी देणारे डेव्हीड धवन देखील सिक्‍वेलच्या स्पर्धेत सामील झाले आहेत. ते आता वरुण धवनसाठी जुडवा-2 नंतर हिरो-1 चा सिक्‍वेल तयार करत आहेत. या प्रोजेक्‍टला वेळ लागणार आहे. मात्र, तो या चित्रपटावरून उत्साहित आहे. वडिलांचा हा चित्रपट मला टाइमपास वाटतो, असे वरुण म्हणतो. आजच्या घडीला या चित्रपटाचा सिक्‍वेल सहजपणे होऊ शकतो. त्यामुळे वडिलांना आपण या चित्रपटासाठी तयार केले, असे वरुणने स्पष्ट केले. मात्र हीच स्थिती गौरांग दोषीची आहे. ते अनेक वर्षानंतर 2002 चा हिट चित्रपट आँखेचा सिक्‍वेल करत आहेत. यावेळी अमिताभशिवाय सर्व कास्टिंगमध्ये मोठे बदल केले आहेत. दिग्दर्शनाची जबाबदारी अनिस बाजमीवर सोपविली आहे.

मुन्नाभाईची क्रेझ 
मुन्नाभाई हा असा एकमेव चित्रपट आहे की त्याचा सिक्‍वेल हा प्रत्येक बाजूने योग्य वाटतो. त्याचे निर्माते राजकुमार हिरानी यांच्या गुणवत्तेवर कोणतेही प्रश्‍न उभा राहात नाहीत. मुन्नाभाई एमबीबीएसच्या यशानंतर त्याचा सिक्‍वेल तयार करण्याची गोष्ट मनात आली पण यासाठी काही वेळ ब्रेक घेतला, असे हिरानी यांनी सांगितले. या ब्रेकचा सकारात्मक परिणाम म्हणजे “लगे रहो मुन्नाभाई’ला मिळालेले यश. त्यानंतर मी कोणतीही घाई केली नाही. त्याच्या सिक्‍वेलच्या पटकथेवर अजूनही काम सुरू आहे. यादरम्यान पीके तयार केला. त्यानंतर संजय दत्तचा बायोपिक संजू देखील तयार केला. आता कदाचित मुन्नाभाईच्या पुढच्या सिक्‍वेलवर लक्ष केंद्रित करेल, असे वाटते. त्याचवेळी या चित्रपटाची शुटिंग पुढीलवर्षी करेल, असेही हिरानी सांगतात. तसे पाहिले तर सिक्‍वेलदेखील संपूर्णपणे नवा चित्रपट असेल. जोपर्यंत पटकथेने समाधान होत नाही, तोपर्यंत त्यावर शुटिंग करणे शक्‍य नाही. एवढेच नाही तर थ्री इडियटचा सिक्‍वेल करण्याबाबतही विचार केला जात आहे, असे हिरानींनी सांगितले.

सिक्‍वेलची पटकथा कशी? 
राजकुमार हिरानी हे आपल्या सिक्‍वेलमध्येही नवीन कहानी सादर करतात. मागील चित्रपटातील एक-दोन पात्रांची निवड करून ते कहानी पुढे नेतात. त्यामुळे त्यांचा संपूर्ण चित्रपट हा सिक्‍वेल नसतो. मात्र अन्य निर्माते अशा प्रकारचा बदल करून नव्याने कथा श्रोत्यांसमोर आणण्यास अपयशी ठरतात.

यामागचे प्रमुख कारण म्हणजे कमकुवत पटकथा. त्यामुळे सिक्‍वेल चालत नाही आणि वेगळे कथानकही भासत नाही. ट्रेड विश्‍लेषक कोमल नाहटा सांगतात की, सर्वकाही फ्रेंचाईजीचा खेळ आहे. एका हिट चित्रपटाचा फॉर्म्युला निर्माता सहजासहजी सोडत नाही. त्यामुळे सिक्‍वेलच्या नावाखाली काहीही खपवले जाते. जर हिट फ्रेंचाईजीचा आश्रय घ्यायचा असेल तर काहीतरी नवीन सादरीकरण हवे. अन्यथा रेस-3 सारखी स्थिती होते.

चांगल्या पटकथेच्या आधारे सिक्‍वेल यशस्वी होऊ शकतो. मात्र, बहुतांश निर्माते हे अशा प्रकारची मेहनत करत नाहीत. यासाठी राकेश रोशनचे उदाहरण फिट बसेल. ते सध्या क्रिश-4 ची तयारी करत आहेत. “कोई मिल गया’नंतर त्यांनी क्रिशची निर्मिती केली. त्यानंतर क्रिश -2, क्रिश-3 ची निर्मिती केली. प्रत्येकवेळी ते नव्या कथानकासह समोर आले. मात्र मागील कथानकाशी त्यांनी नाळ कायम ठेवली. एका अर्थाने यास परफेक्‍ट सिक्‍वेल म्हणता येईल. फ्रेंचाईजीचा योग्य तऱ्हेने कसा उपयोग करावा, हे राकेश रोशनकडून शिकायला हवे.

हेराफेरी-3 ची तयारी 
सध्या फिरोज नादियावाला हेराफेरी-3च्या प्री प्रॉडक्‍शनमध्ये बिझी आहेत. 2000 वर्षातील हीट फिल्म हेराफेरीचा सिक्‍वेल 2006 मध्ये फिर हेराफेरी आला होता. यात परेश रावल, अक्षय आणि सुनील शेट्टी अशी तिकडी होती. मात्र 2017 च्या
हेरीफेरी-3 च्या कास्टिंगमध्ये बरेच बदल केले. यावेळी तिन्ही पात्र बदलले आहेत. त्याजागी नाना पाटेकर, जॉन अब्राहम आणि अभिषेकला आणले आहे. यावेळी सिक्‍वेलमध्ये मोठा बदल दिसेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

नवीन कल्पनेपासून सावध पवित्रा 
ट्रेड पंडितच्या मते, अन्य चित्रपटांप्रमाणेच सिक्‍वेलचे भूत फार काळ टिकणार नाही. सिक्‍वेलमध्ये काल्पनिकतेचा अभाव असल्यामुळे त्यातील गंमत फार काळ चालणार नाही. सिक्‍वेलच्या नावाखाली मनाप्रमाणे पटकथेत बदल केले जातील. मात्र, प्रत्यक्षात खेळ हा फ्रेंचाईजीचा असेल. नावीन्य नसल्याने फ्रेंचाईजीची क्रेझदेखील कमी होईल आणि सिक्‍वेलचा फंडादेखील आपोआप कमी होईल. अशा स्थितीत राजकुमार हिरानी आणि राकेश रोशनसारखे दिग्दर्शक मैदानात टिकून राहतील.

Leave A Reply

Your email address will not be published.