कोपरगाव – गरिबीतून झेप घेत आलेल्या संकटांवर मात करुन आखाती देशाचा मसालाकिंग होऊन महाराष्ट्राचा झेंडा सातासमुद्रापार फडकविल्याची भावना प्रसिद्ध उद्योजक डॉ. धनंजय दातार यांनी व्यक्त केले.
तरुणांना दुबईमध्ये व्यवसाय व नोकरीची संधी या विषयावर डॉ. दातार यांच्या व्याख्यानाचे आयोजन कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ, लायन्स, लायनेस क्लब, महिला व युवा आघाडी आणि किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आशुतोष काळे, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे, माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे, स्वाती कोयटे, संदीप कोयटे, तुलसीदास खुबानी मोहन झंवर, उत्तरा मोने यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. दातार म्हणाले की, दुबईमध्ये छोट्याशा दुकानापासून व्यवसायाला सुरुवात करत गेल्या तीस वर्षांत आखाती देशात 41 सुपरमार्केटची स्वतःची रिटेल औटलेटची साखळी निर्माण केली. काळानुसार मी स्वतःसह व्यवसायात बदल केला. हल्ली लोकांना झगमगाट केला आवडतो. त्यावरुन ग्राहकांना आकर्षीत केले पाहिजे. मनामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे. माणसापेक्षाही पैशाला महत्व आले आहे. जगात काम करायला खूप संधी आहे.
त्यासाठी वेळ द्यावा लागतो. नोकरी व व्यवसायासाठी जगात संधी आहे. मनामध्ये एखादी गोष्ट करण्याची चिड आली पहिजे. ती पूर्ण करण्यासाठी पेटून उठला पाहिजे. ज्याला नोटा मोजायचे कळाले, त्याला ग्राहकाला काय पाहिजे, ते समजते. मग व्यवसायात तो यशस्वी होऊ शकतो. जेथे संधी मिळेल तेथे नफा कमावलाच पाहिजे.
कर्ज घेणे व्यवसायाचे टॉनिक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. फोर्ब्स मिडल ईस्टतर्फे गेल्या वर्षी टॉप इंडियन लिडर्स इन दी अरब वर्ल्ड 2019- रिटेल ऍवॉर्ड हा पुरस्कार डॉ. दातार यांना मिळाला आहे. फोर्ब्सच्या 100 आघाडीतील भारतीयांमध्ये मानांकन यादीत महाराष्ट्रीयन म्हणून ते एकमेव आहेत. अरेबियन बिझनेस रॅंकमध्ये 14 वे, तर फोर्ब्स यादीत 27 वे मानांकन मिळाले आहे.
आमदार काळे म्हणाले, मी कोपरगाव तालुक्याची बाजार पेठ फुलविण्यासाठी विषेश प्रयत्न करणार आहे. तरुणांना दुबईसह विदेशात जाण्याची वेळ येणार नाही. त्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रास्ताविक व्यापारी असोसिएशनचे सुधीर डागा यांनी केले.