यवत (वार्ताहर) – दहिटणे (ता. दौंड) येथील करोना बाधित 70 वर्षीय वृद्धाचा दुसरा वैद्यकीय अहवाल शनिवारी (दि. 16) प्राप्त झाला असून तो अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक राजगे यांनी दिली.
निगेटिव्ह वैद्यकीय अहवाल आल्यामुळे वृद्धाने करोनावर मात केली आहे. या वृद्धाला पोटाच्या विकारामुळे ससून रुग्णालयात काही दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे हे वृद्ध ससून रुग्णालयात काही दिवस आपल्या मुलासोबत राहिले होते. त्यामुळे तेथेच या वृद्धाला करोनाची लागण झाली होती.
दहिटणे येथे दि. 29 एप्रिल रोजी तालुक्यात पहिला करोना बाधित रुग्ण आढळून आला होता. त्यामुळे दौंड तालुक्यात खळबळ उडाली होती तर सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या रुग्णावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 23 जणांची करोना विषाणूची चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत सर्वांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे तालुक्यातील सर्वांना दिलासा मिळाला होता.