धैर्यशील मोहिते-पाटील यांचे अधिकाऱ्यांना खडेबोल !
अकलूज, दि 14 (प्रतिनिधी)- अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे यंदा रुग्णांचा शिबिरास अत्यल्प प्रतिसाद लाभला आहे, शासन नेहमीच चांगल्या योजना राबवते. परंतू अधिकारी त्याची अंमलबजावणी व्यवस्थित करत नाहीत, असे शिवामृत दूध संघाचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. अकलूज (ता. माळशिरस) उपजिल्हा रुग्णालयात युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज दिनानिमित्त महाआरोग्य शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्या हेमलता चांडोले, उपसरपंच धनंजय देशमुख, सुनंदा फुले, डॉ. मुकुंद जामदार, डॉ.राजीव राणे, डॉ. अंजली कदम, डॉ.विद्युत शहा, डॉ. संतोष खडतरे, डॉ. मिलिंद जामदार, इंडियन मेडीकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन एकतपुरे आदी उपस्थित होते. शिबीरामध्ये अकलूज क्रिटीकेअर हॉस्पिटल, डॉ. कदम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. देवडीकर हॉस्पिटल यांनी सहभाग घेतला होता.
- या पुढे आम्ही योग्य नियोजन करू
महाआरोग्य शिबिर घेण्याविषयी आम्हाला केंद्र शासनाकडूनच उशिरा माहिती मिळाली. त्यामुळे जिल्ह्यातील रूग्णालयांना कळविण्यास उशीर झाला. अकलूज येथे शिबीराचा प्रचार करण्यास वेळ मिळाला नसल्याबद्दल समजले. याबाबत आम्ही पुढे योग्य नियोजन करू, असे डॉ. वाघमारे यांनी सांगितले.