एनआरसी मधून आणखी एक लाख लोकांना वगळले

गुवाहाटी – नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स म्हणजेच एनआरसी च्या यादीतून आसामातील आणखी एक लाख दोन हजार लोकांना वगळण्यात आल्याने तेथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. या यादीतून या आधीच चाळीस लाख लोकांना वगळण्यात आले आहेत. जे या देशाचे नागरीक असल्याचा सबळ पुरावा देऊ शकले नाहीत अशा लोकांची नावे या रजिस्टर मधून वगळण्यात आली आहेत.

या नव्या माहितीच्या संबंधात एनआरसीच्या समन्वयकांनी एक निवेदन प्रसारीत केले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की एनआरसी मधून 1 लाख 2 हजार 462 लोकांची नावे त्यांच्या नागरीकत्वाचा सबळ पुरावा नसल्याने वगळण्यात आली आहेत. आसामातील बेकायदेशीर नागरीक हुडकून काढण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही प्रक्रिया दहा वर्षांहून अधिक काळ सुरू आहे.

या यादीत दुरूस्ती करण्याचे काम सध्या सुरू असून अंतिम नागरीकत्वाची यादी 31 जुलै रोजी प्रसारीत केली जाणार आहे. या यादीतून वगळण्यात आलेल्या नागरीकांची नावे वेबसाईटवर टाकण्यात आली असून स्थानिक एनआरसी सेवा केंद्रांमध्येही ती यादी लावण्यात आली आहे. ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत त्यांना अपिल करण्याचा अधिकार असून अशा अपिलांवरील सुनावणी 5 जुलै पासून सुरू होणार आहे.

आसामातील 3 कोटी 29 लाख लोकांनी आपण या देशाचे नागरीक असल्याचा दावा करून या रजिस्टर मध्ये आपली नोंदणी करण्याचे अर्ज केले आहेत. त्यापैकी 2 कोटी 90 लाख लोकांचे अर्ज वैध ठरले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.