केरळ-कर्नाटकमध्ये सीमांवरील निर्बंधांवरून जुंपली; विजयन यांचे थेट मोदींना पत्र

बंगळूर – केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सीमांवरील निर्बंधांवरून तणातणी सुरू झाली आहे. त्यातून केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

मागील काही दिवसांत केरळ आणि महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपशासित कर्नाटकने त्या दोन्ही शेजारील राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांना करोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. त्या निर्णयामुळे केरळवासीयांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे वृत्त आहे. त्याची दखल घेऊन डाव्या पक्षांची सत्ता असणाऱ्या केरळ सरकारने कर्नाटकच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. तसे पत्र विजयन यांनी मोदींना पाठवले आहे. कर्नाटकने नवे निर्बंध घातल्याने ते राज्य आणि केरळमधील सीमांवर विद्यार्थी, मालवाहतूक करणारे ट्रक, वैद्यकीय उपचारासाठी जाणारे रूग्ण यांच्यासह सगळ्यांनाच अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

केंद्र सरकारने आंतरराज्यीय प्रवासावर निर्बंध न घालण्याच्या सूचना आधीच दिल्या आहेत. कर्नाटकचा निर्णय त्या सूचनांशी विसंगत आहे, अशी भूमिका विजयन यांनी पत्रातून मांडली आहे. मात्र, कर्नाटक सरकारने आंतरराज्यीय प्रवासावर निर्बंध घातल्याचा इन्कार केला आहे. केवळ सावधगिरीचा उपाय म्हणून केरळमधून येणाऱ्यांसाठी करोनाविषयक चाचणीचा निगेटीव्ह अहवाल अनिवार्य करण्यात आल्याचे त्या सरकारने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.