कोरोनाबाधित डॉक्‍टरच्या संपर्कातील 900 जणांचे घरातच विलगीकरण

नवी दिल्ली : दिल्लीत मोहोल्ला क्‍लिनिकमधील एका डॉक्‍टरला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या 900 जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सौदी अरेबियातून अलिकडेच आलेल्या एका महिलेच्या संपर्कात हे डॉक्‍टर 12 मार्चला आले होते.

मौजीपुरा येथील मोहानपुरा भागातील मोहल्ला क्‍लिनिकमध्ये 12 ते 18 मार्च दरम्यान भेट दिलेल्या सर्वांना त्यांच्या घरात 15 दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, असे दिल्लीच्या आरोग्यमंत्री सतेंद्र जैन यांनी सांगितले. त्यांना नियंत्रण कक्षाशी संपर्क साधायला सांगितले आहे.

ही महिला कोरोनाची लक्षणे घेऊन रुग्णालयात उपचारासाठी आली होती. तिची टेस्ट पाच दिवसांनी पॉझिटिव्ह आली. त्याच दिवशी या डॉक्‍टरांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. या डॉक्‍टरची पत्नी आणि मुलीचीही चाचणी बुधवारी घेण्यात आली आहे.

ही घटना घडल्यानंतरही सर्व मोहल्ला क्‍लिनिक खुली राहतील. ही मोहल्ला क्‍लिनिक उपचारासाठी पैसे नसणाऱ्या गरीबांसाठी आहेत. त्यामुळे ती सुरूच राहतील, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 21 दिवस लॉकडाऊनला सहकार्य करा. डेअरी, किराणा आणि औषधे खरेदी व्यतिरिक्त लोकांनी बाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.