पिंपरी – एक हजार चौरस फुटापेक्षा कमी अनधिकृत बांधकाम असलेल्या मिळकतींचा शास्तीकर माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे याचा फायदा तब्बल 56 हजार 703 मिळकतींना झाला आहे. सर्वसामान्य आणि गरिबांच्या मिळकती शास्तीच्या जाचातून मुक्त झाल्या असल्या तरी एक हजार चौरस फुटांपेक्षा अधिक बांधकामाला शास्ती कायम असल्यामुळे या बांधकामांचा शास्तीकर तात्काळ रद्द करावा, अशी मागणी होत आहे.
महापालिकेच्या नोंदीनुसार शहरामध्ये एकूण 5 लाख 14 हजार 190 मिळकती आहेत. त्यामधील 4 लाख 36 हजार 285 निवासी मिळकती आहेत. महापालिका क्षेत्रात 4 जानेवारी 2008 नंतर झालेल्या अनधिकृत बांधकामांना शास्तीकर लागू करण्यात आला होता. 2012-13 पासून हा शास्तीकर वसूल करण्यात येत आहे. गेल्या वर्षापर्यंत 265 कोटी शास्तीकर थकीत होता. तर, चालू वर्षाची शास्तीकराची मागणी 55 कोटी इतकी आहे.
राज्य सरकारने सुरवातीला शास्ती करामध्ये 600 चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामांना माफी दिली होती. तर, 601 ते 1 हजार चौरस फुटापर्यंतच्या बांधकामांसाठी शास्ती करात 50 टक्के सवलत दिलेली होती. दरम्यान, 4 मार्च 2019 ला शासनाने काढलेल्या आदेशानुसार एक हजार चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने शास्तीकरात माफी दिल्याने याचा फायदा 56 हजार 703 मिळकतींना झाला आहे. 1001 ते 2 हजार चौरस फुटापर्यंतच्या बांधकामांना अद्यापही 50 टक्के शास्तीकर लागू असून 2001 चौरस फुटांपासून पुढील बांधकामांसाठी दुप्पट शास्तीकर आकारणी केली जात आहे. हा शास्तीकर माफ करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.