नवी दिल्ली -इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) विश्वासार्हतेविषयी शंका घेणाऱ्या ४२ याचिका आतापर्यंत दाखल करण्यात आल्या. त्या याचिका सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांनी फेटाळल्या, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने लोकसभेत देण्यात आली.
ईव्हीएममध्ये फेरफार होऊ नये यासाठी उपाय करण्याशी संबंधित प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी लेखी उत्तर दिले. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार फेरफार टाळण्यासाठी ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक स्वरूपात संरक्षित करण्यात आले आहेत. त्यामध्ये विविध तांत्रिक सुरक्षाविषयक घटक आहेत. ईव्हीएम म्हणजे स्टँडअलोन मशीन आहे.
त्यामध्ये कुठली रेडिओ फ्रिक्वेन्सी दळणवळण क्षमता नाही. त्यामुळे वायरलेस, ब्लूटुथ आणि वाय-फायच्या माध्यमातून ईव्हीएमशी संपर्क साधला जाऊ शकत नाही. ईव्हीएमवर शंका घेणाऱ्या अनेक याचिका दाखल झाल्या.
मात्र, ते यंत्र विश्वासार्ह आणि फेरफारापासून मुक्त असल्याचा निर्वाळा वरिष्ठ न्यायालयांनी वारंवार दिला, अशी भूमिका त्यांनी उत्तरातून मांडली. काही राज्यांत नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांच्या निकालांनंतर विरोधकांनी पुन्हा ईव्हीएमवर आक्षेप घेतले आहेत.