नवी दिल्ली – जगभरात थैमान घालणाऱ्या करोना संसर्गाला रोखण्यासाठी अनेक देशांनी युद्धस्तरावर करोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण केले. त्यानंतर काही देशांनी लागू केलेली मास्क सक्ती देखील मागे घेतली. यामध्ये अमेरिकेचा देखील समावेश होता. मास्कमुक्त झालेल्या अमेरिकेने सुटकेचा श्वास सोडला होता. मात्र आता अमेरिकेत नवीन बुरशीजन्य आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत.
अमेरिकेत अनेकांना कँडिडा ऑरिस या बुरशीजन्य आजाराची लागणी झाल्याचं आढळून आलं आहे. येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानुसार, गुरुवारी डल्लासमधील दोन रुग्णालयांत आणि वॉशिंग्टन डीसीमधील एका नर्सिंग होममध्ये कँडिडा ऑरिस या बुरशीचे रुग्ण आढळून आले.
यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (CDC) दिलेल्या माहितीनुसार कँडिडा ऑरिस हे यीस्टचं गंभीर रूप आहे. या बुरशीमुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. इतर आजार असणाऱ्या लोकांना या बुरशीची बाधा झाल्यास मृत्यूचा धोका अधिक असतो.
वॉशिंग्टन डीसीमधल्या नर्सिंग होममध्ये कँडिडा ऑरिसचे 101 रुग्ण आढळून आले आहेत. तर डल्लासमधल्या रुग्णालयात 22 रुग्णांना या फंसगची लागण झाल्याचं दिसून आलं आहे.
अमेरिकेच्या आरोग्य संस्थेने या फंगसला जागतिक धोका म्हणून जाहीर केलं आहे. कित्येक अँटीफंगल औषधांचा यावर काहीच परिणाम होत नसल्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञ चिंतित आहेत.
एका रुग्णामधून दुसऱ्या रुग्णामध्ये संसर्ग होणारा कँडिडा ऑरिस क्लस्टर पहिल्यांदाच आढळला आहे. त्यातच या फंगसवर अद्याप उपचार उपलब्ध नाहीत. या फंगसची लागण झालेल्या तीनपैकी एकाहून अधिक रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे चिंता वाढली आहे.