जिनेव्हा, दि. 13- आफ्रिका खंडातील सेशेल्स या देशात लसीकरणानंतरही करोना रुग्णांची संख्या झपाट्याने पुन्हा वाढू लागल्याने जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.
इस्रायल, चीन या देशात करोनाची रुग्णसंख्या कमालीची घटली आहे. येथे लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
मात्र, आजही अनेक देशांत करोनाची भीती कायम आहे. करोनाच्या संकटापासून बचावासाठी सध्या लस हा एकमेव पर्याय समोर आहे. त्यामुळे सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाविरोधातील लसीकरण वाढवण्यावर भर देत आहेत. मात्र, आफ्रिका खंडातील सेशेल्स या देशात लसीकरणानंतरही करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने लोक भीतीच्या छायेत आहेत. जगात लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक लोकांचे लसीकरण हे सेशेल्समध्येच झाले आहे.
7 मे पर्यंत या देशातील करोना रुग्णांचे प्रमाण हे दुप्पट झाले आहे. लसीकरणानंतर पुन्हा करोनात वाढ झाल्याने जगभरातील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. सेशेल्सच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार येथे गेल्या आठवडाभरापासून ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. तसेच नव्या रुग्णांचा आकडा हा 2486पर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे करोनाची बाधा झालेल्या लोकांपैकी तब्बल 37 टक्के लोकांनी करोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतले होते.
चीनची लस घेतली
सेशेल्समध्ये 57 टक्के लोकांना चीनमध्ये विकसित झालेली सिनोफार्म आणि उर्वरित लोकांना भारतात उत्पादित झालेली कोविशिल्ड ही लस देण्यात आली होती. दरम्यान, भारतामध्येही बहुतांश लोकांना कोविशिल्ड ही लसच टोचली जात आहे. त्यामुळे लस घेऊनही करोना रुग्ण वाढ होत असतील तर चिंता व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. असे असले तरी एक चांगली बातमी म्हणजे, लस घेतल्यानंतरही करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींपैकी कुणाचाही करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेला नाही.