तिरुवनंतपुरम – केरळमध्ये आफ्रिकन स्वाईन फिव्हरचा प्रादुर्भाव होत असल्याच्या संशयाने पशुपालन विभागाने सुमारे 300 डुकरांची कत्तल करण्याचा निर्णय घेतला आहे. वायनाड येथील मनंथवेडी येथील संसर्ग झालेल्या 300 डुकरांची कत्तल करण्यात येणार आहे, असे केरळमधील पशुपालन मंत्री जे. चिंजू राणी यांनी काल सांगितले.
केरळमधील दोन ठिकाणी आफ्रिकन स्वाईन फिव्हरची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मनंथवाडी येथील 43 डुकरांना आणि थविंजल फार्ममधील एका डुकराला संसर्ग झाला होता, तर त्याच शेतातील इतर 360 डुकरांना संसर्गाची लक्षणे दिसून आली असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
संसर्ग झाल्याच्या ठिकाणापासून 10 किलोमीटरच्या परिघात प्रशासनाने तपासणी करायला सुरुवात केली आहे. तसेच या भागातील डुकरांच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. मात्र या बागातील पशुपालकांनी पुन्हा एकदा तपासण्या कराव्यात आणि त्यानंतरच या उपाय योजना कराव्यात असे सुचवले आहे. प्रशासनाने जर सर्व डुकरांची कत्तल करण्याचे पाऊल उचलले तर विम्याची रक्कम मिळण्याची शक्यता फारच कमी आहे, असे पशुपालकांचे म्हणणे आहे.