झेडपीच्या 374 शाळांचा शिष्यवृत्तीचा निकाल शून्य टक्‍के

वर्गशिक्षक, मुख्याध्यापकांसह अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव
झेडपीत शाळेत बालकांसाठी बाल संस्कार वर्ग


नगर – फेब्रुवारी महिन्यात झालेल्या शिष्यवृत्ती उच्च प्राथमिक व पूर्व प्राथमिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात जिल्हा परिषदेच्या 791 पैकी केवळ 20 शाळांचा निकाला शंभर टक्‍के लागला आहे. यावरून आज झालेल्या जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत शिक्षणाधिकाऱ्यांसह गटशिक्षणाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी करण्यात आली. शुन्य टक्‍के निकाल लागलेल्या पाचवीच्या 310 तर आठवीच्या 64 अशा 374 शाळांच्या वर्गशिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा सूचना सदस्यांनी केली.

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीच्या सभापती राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची बैठक झाली. या बैठकीत शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालावरून शिक्षण विभागाचे चांगलेच वाभाडे काढण्यात आले. शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क जिल्हा परिषद भरते. त्याबरोबर जास्तीत-जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण व्हावे म्हणून सराव परीक्षा घेण्यात येतात. त्यावर लाखो रुपये खर्च जिल्हा परिषद खर्च करीत असतांना उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमीच आहे. या परीक्षेला 12 हजार 857 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी केवळ 2 हजार 82 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

200 पेक्षा जास्त गुण मिळविणारे केवळ 263 विद्यार्थी आहे. जिल्हा परिषदेच्या 791 पैकी 20 शाळांचा निकाल शंभर टक्‍के लागला आहे. त्या शाळांचे अभिनंदन करण्यात आले. परंतु 374 शाळांचा शून्य टक्‍के निकाल लागल्याबद्दल नाराजी व्यक्‍त करण्यात आली. पाचवीच्या 310 तर आठवीच्या 64 शाळांचा निकाल शून्य टक्‍के लागला असून याला संबंधित शाळांचे वर्गशिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी जबाबदार धरण्यात येवून त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई करण्याची सूचना सदस्यांनी केली.

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये 3 ते 6 वयोगटांतील बालकांसाठी अंगणवाडीच्या वेळनंतर शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून या शैक्षणिक वर्षापासून बाल संस्कार वर्ग सुरू करण्याचे आदेश उपाध्यक्ष घुले यांनी दिले. तसेच या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा प्रवेश वाढीकडे लक्ष देण्यात येवून प्रवेशाची तयारी करावी. प्रवेशोत्सव, पट वाढविणे, पाचवीचे वर्ग सुरू करणे, विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशीचे स्वागत याची तयारी करण्याचे आदेश घुले यांनी दिले. या बैठकीला सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, उज्ज्वला ठुबे, शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, निरतंरच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे आदी उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.