न्यायालयाच्या आदेशानंतरही कामगार गेट बाहेरच

सोना अलाईज कंपनीकडून कामगारांची अडवणूक : न्यायालयाच्या आदेशाचा अवमान
प्रशांत ढावरे

लोणंद – खंडाळा तालुक्‍यातील लोणंद एम.आय.डी.सी.तील सोना अलाईज कंपनीतील कामगारांना पुणे येथील औद्योगिक न्यायालयाने कामावर हजर राहण्याचा आदेश कंपनी व्यवस्थापन व सोना अलाईज एम्प्लॉईज युनियनला दिला असतानाही कंपनी व्यवस्थापन अडवणूक करून कामगारांना कामावर घेत नसल्याची माहिती सोना अलाईज एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष विश्‍वास क्षीरसागर यांनी दिली.

लोणंद एम.आय.डी.सी.तील सोना अलाईज कंपनीतील 350 कामगारांनी पगारवाढ, इन्शुरन्स अन्य मागण्या कंपनी व्यवस्थापनाकडे केली होती. गेल्या वर्षभरापासून कंपनी व्यवस्थापनाकडे सोना अलाईज एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी पाठपुरावा करीत आहे. परंतु कंपनी व्यवस्थापनाने त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करून कामगारांना कामापासून दूर ठेवले.
कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना कंपनी गेटच्या पासून एक किलोमीटरच्या आत येण्यास मज्जाव करून कामगारांना 115 दिवस कामगारांना काम करण्यापासून दूर ठेवले आहे.

या संदर्भात सोना अलाईज कंपनीने औद्योगिक न्यायालयात एम्प्लॉईज युनियनच्या विरोधात तक्रार दाखल होती. त्यावर औद्योगिक न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन कामगारांनी प्रथम कामावर हजर होण्याचे आदेश दिला. त्यानुसार शुक्रवारी कामगार कंपनीच्या गेटवर सकाळी 9 वाजता गेले असता कंपनीचे मनुष्यबळ विकास विभागाचे जनरल मॅनेजर प्रदीप राऊत यांनी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला कळवितो, त्यानंतर सांगतो असे सांगून कामगारांना कामावर घेण्यास अडवणूक केली असल्याचे युनियनचे अध्यक्ष विश्‍वास क्षीरसागर यांनी सांगितले.

दरम्यान, औद्योगिक न्यायालयाचा आदेश असतानाही कंपनी व्यवस्थापनाने न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान न राखल्यामुळे कामगारा मध्ये नाराजीचा सूर, असंतोष निर्माण झालेला आहे. गेल्या 115 दिवसापासून कामगार आणि कामगारांचे कुटूंबाचे उपासमार सुरू झालेली आहे. कामगार हवालदिल झाला आहे. कुटूंबाची वाताहात झालेली आहे. याठिकाणी काम करणारे 80 टक्के कामगार स्थानिक, भूमिपूत्र, तसेच लोणंद आणि लोणंद परिसरातील आहेत. कंपनी व्यवस्थापनाने औद्योगिक न्यायालयाचा आदेशानुसार कामगारांना कामावर न घेतल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा युनियनचे अध्यक्ष विश्‍वास क्षीरसागर यांनी दिला आहे. तरी संबंधीत व्यवस्थापनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी कामगारांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.