बीड : बीड विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज बीडमध्ये विविध प्रश्न संदर्भात पत्रकार परिषद घेतली. या परिषदेदरम्यान त्यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्यावर टीका केली. निवडणुका जाहीर झाल्यावरच ते ॲक्टिव्ह होतात आणि ते निवडणूक आल्यानंतरच ते प्रकट होतात. अशा शब्दांत त्यांनी काकांवर टीका केली.
नेमके काय म्हणाले संदीप क्षीरसागर ?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर बोलताना म्हणाले की, आमचे काका निवडणुका आल्या की, सक्रिय होतात. आता ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या अफवा आहेत, परंतु मी एक पक्षाचा जिल्हाध्यक्ष आणि आमदार म्हणून हे जबाबदारीनं सांगू शकतो की, या निव्वळ अफवा आहेत, असा कुठलाही प्रकार नसल्याचं म्हटलं आहे.
काका जयदत्त क्षीरसागर निवडणुका आल्या की, सक्रिय होतात. परंतु, पडल्यानंतर ते चांगल्या पद्धतीनं काम करतात, असा टोला देखील आमदार संदीप क्षीरसागर यांनी यावेळी लगावला. बीडमध्ये केवळ श्रेयवादाचं राजकारण सुरू असून प्रत्यक्षात काम मात्र होत नाही, हे दुर्दैव असेदेखील संदीप क्षीरसागर यावेळी म्हणाले.