“आयुष्यमान भारत” पेक्षा आमची योजना सर्वोत्कृष्ट

अरविंद केजरीवाल: राज्यात योजना राबविण्यास दर्शविला नकार

नवी दिल्ली- केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारमध्ये अद्यापही संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातच केंद्राच्या “आयुष्यमान भारत” या आरोग्य योजनेवरुन पुन्हा एकदा नव्याने संघर्ष उफाळून आला आहे. ही योजना दिल्लीकरांना लागू करण्यात यावी असे केंद्राकडून दिल्ली सरकारला सांगण्यात आले होते. मात्र, “आयुष्यमान भारत” पेक्षा आमची योजना दहा पटीने चांगली असल्याचे सांगत केजरीवालांनी ही योजना राज्यात लागू करण्यास नकार दर्शविला आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी 3 जून रोजी पत्र लिहून दिल्ली सरकारला केंद्राची आयुष्यमान भारत योजना दिल्लीकरांसाठी सुरु करण्यास सांगितले होते. मात्र, या योजनेपेक्षा आमची योजना दहा पटीने चांगली असून आमच्या योजनेत “आयुष्यमान भारत’ योजनेच्या सर्व गोष्टी समाविष्ट आहेतच. त्याचबरोबर दिल्लीकरांसाठी इतरही अनेक सुविधा या योजनेत असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेश आणि हरयाणा ही दोन राज्ये दिल्लीला जोडून आहेत. या राज्यांमध्ये केंद्राची “आयुष्यमान भारत’ योजना सुरु आहे. मात्र, तरीही इथले लाखो रुग्ण दिल्लीतील सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येतात. तर दिल्लीचा कोणताही नागरिक या राज्यांमध्ये उपचारांसाठी जात नाही. त्यामुळे निश्‍चितच आमची योजना चांगली आहे, असा तर्क त्यांनी लढवला आहे.

केजरीवाल म्हणाले, दिल्लीत सुरु असलेली आरोग्य योजना बंद करुन दुसरी योजना सुरु करुन कोणाचाही फायदा होणार नाही. यामुळे लाखो दिल्लीकरांचेच नुकसान होईल. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी त्यांच्या नजरेस आलेली अशी गोष्ट सांगावी जी दिल्लीच्या आरोग्य योजनेत नाही आणि असेल तर कृपया सांगावे. आम्ही त्या सर्व चांगल्या बाबींना दिल्लीच्या योजनेत सामिल करुन घेऊ, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.