मोदींच्या कॅबिनेटमध्ये जेडीयुला एकच मंत्रिपद देण्याचा भाजपचा प्रस्ताव नितीश कुमारांनी फेटाळला

पाटणा – जनता दलाचे (युनायटेड) सर्वेसर्वा तथा बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात जेडीयुला केवळ एकच मंत्रिपद देण्याचा भाजपतर्फे ठेवण्यात आलेला प्रस्ताव फेटाळला आहे. याबाबत एका वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, “नव्या मंत्रिमंडळात आम्हाला केवळ एकच जागा देणं म्हणजे आमचा नव्या सरकारमध्ये केवळ प्रतीकात्मक सहभाग असल्यासारखे होईल. त्यामुळे आम्ही त्यांना हे मंत्रिपद स्वीकारत नसल्याचं सांगितलं आहे. ही काही मोठी गोष्ट नसून आम्ही आजही पूर्णपणे एनडीएमध्येच आहोत आणि यापुढेही आम्ही एकत्रच काम करणार आहोत, यामध्ये कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही.”

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दलाची भाजपसोबत युती असून ते सध्या बिहारमध्ये सत्तेत आहेत. भाजप व जेडी(यु)ने नुकत्याच पार पडलेली लोकसभा निवडणूक देखील एकत्र लढवली असून यामध्ये त्यांनी घवघवीत यश देखील संपादित केलं आहे. बिहारमध्ये भाजपला सर्वाधिक १७ तर जेडी(यु)ला १६ जागांवर यश मिळालं आहे.

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात केवळ एक जागा देण्याचा प्रस्ताव भाजपतर्फे ठेवण्यात आल्याने जेडीयुने आपल्याला एकही मंत्रिपद नको अशी भूमिका मांडली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.