मुंबई – सत्ता संघर्षावर सुरु असलेली सुनावणी पूर्ण झाली आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राज्यात विविध स्तरातील वर्गाकडून सरकारविरोधात मार्च निघताहेत. विरोधकांकडून तपास यंत्रणांच्या वापरावर आक्षेप नोंदवला जात आहे. अशात भाजप आमदाराने सभागृत केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे.
राज्यातून अनेक घोटाळ्यांचे आरोप असलेले नेते भाजपमध्ये दाखल झाले होते. यानंतर या नेत्यांवर तपास यंत्रणा कारवाई करत नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. भाजपकडे वॉशिंग पावडर आहे ज्यात भाजप या नेत्यांना धुवून स्वच्छ करत असल्याची टोलेबाजी देखील विरोधक करत आहेत. यावरूनच एका भाजप आमदाराने थेट विधानपरिषदेत आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर असल्याचे विधान केले आहे.
नुकतंच ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांच्या मुलाने शिंदे गटात प्रवेश केला. यावरूनच भाजप आमदार रमेश पाटील यांनी केलेलं विधान सध्या चर्चेत आले आहे. पाटील यावेळी भूषण देसाई यांच्याबाबत बोलत होते. “कुणीतरी काल सांगितलं की एमआयडीसीच्या प्लॉटची चारशे कोटींची फाईल आहे म्हणून ते शिवसेनेत आले. पण ते त्यासाठी आलेले नाहीत. हे सरकार चांगलं काम करतंय. चांगला न्याय देतंय म्हणून ते इथे आले” असं पाटील यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना पाटील म्हणतात,”आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे. ती गुजरातमधून येते. त्यामुळे आम्ही साफसफाई करून घेतो. जो माणूस आमच्याकडे येईल, तो स्वच्छ होणार आहे” पाटील यांनी केलेल्या या विधानाचा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाटील यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. सबकी (भ्रष्टजनों की) पसंद ‘निरमा’ अशा आशयाखाली राष्ट्रवादीने भाजप आमदाराचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सबकी (भ्रष्टजनों की) पसंद ‘निरमा’ (BJP)
भाजपच्या निवडून आलेल्या विधानसभेतील आमदारांनी विधान परिषदेत निवडून दिलेले भाजप आमदार रमेश पाटील यांनी मुक्ताफळे उधळून भाजप वॉशिंग मशीनचा खरा चेहरा उघड केला. मा. सभापती यांना विनंती की हे सत्य कथन सभागृहाच्या कामकाजातून वगळण्यात येऊ नये. pic.twitter.com/szdeGZYJO2
— NCP (@NCPspeaks) March 17, 2023