आमच्या सभेचा तुम्हालाही फायदा होईल – राज ठाकरे

मोहन जोशी यांनी घेतली पुण्यात भेट

पुणे – “आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला जाहीर पाठींबा दिलेला नाही. मात्र, भाजपविरोधात आम्ही घेत असलेल्या सभांचा तुम्हालाही फायदा होईल, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडीचे लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

जोशी यांनी सोमवारी सकाळी “राज महल’ येथे जाऊन मुलगा रोहीतसह ठाकरे यांची भेट घेतली. मनसे नेते बाबू वागसकर, अनिल शिदोरे तसेच हर्षल देशपांडे यावेळी उपस्थित होते. सुमारे 10 ते 12 मिनिटे ही भेट झाल्याचे सांगण्यात आले.

राज ठाकरे यांची 18 एप्रिलला पुण्यात सभा होणार आहे. पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सीमेवर सिंहगड रस्त्यावरील शिंदे मैदान येथे ही सभा होणार असल्याने त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपविरोधी उमेदवारांना मिळणार आहे. या सभेसाठी अप्रत्यक्षपक्षणे कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादीकडूनही तयारी करण्यात येत आहे. त्यातच, सोलापूर आणि पुढे कोल्हापूरला सभेसाठी जाण्याससाठी राज ठाकरे रविवारी रात्री उशिरा पुण्यात मुक्कामी आले होते. हे लक्षात घेऊन जोशी यांनी सकाळी 8 वाजता ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते. या अवघ्या दहा मिनिटांच्या बैठकीत जोशी यांनी मनसेकडून सहकार्य मिळावे, अशी विनंती ठाकरे यांना केली. यावेळी ठाकरे यांनी जाहीरपणे पाठिंबा अथवा आश्‍वासनही दिले नाही, तर “आमच्या सभेचा तुम्हालाही फायदा होईल,’ असे सांगत जोशी यांना शुभेच्छा दिल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.