वॉशिंग्टन – भारतातील करोना विस्फोटाच्या स्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे असे अमेरिकेने म्हटले आहे. भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालण्याची सूचना अमेरिकेच्या साथ रोग नियंत्रण विभागाने या आधीच केली आहे.
अमेरिकेच्या विदेश विभागाचे प्रवक्ते नेट प्राईस यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही भारतातील स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. ते म्हणाले की, सोमवारीच भारताचे विदेश मंत्री जयशंकर यांच्याशी अमेरिकेचे विदेश मंत्री टोनी ब्लिंकेन यांनी फोनवर भारतातील स्थितीबाबत चर्चा केली आहे.
या स्थितीत भारताला सर्व शक्य ती मदत करण्याचा अमेरिकेचा इरादा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने भारतातील करोनाच्या संबंधात जे आकडे दिले जात आहेत त्याचीही अमेरिकेत नोंद घेतली जात आहे.