आमचाही इको-फ्रेण्डली गणपती

बारा ते तेरा वर्षांपूर्वी मी आणि माझ्या बहिणीने घरी गणपती बसवायचे ठरवले. त्यावेळी पर्यावरणपूरक गणपतींचा आजच्याइतका गाजावाजा नव्हता. पण आमच्या घरात आई-बाबा आम्हाला लहानपणापासूनच पर्यावरणप्रेमाचे आणि टाकाऊपासून टिकाऊ करण्याचे धडे देत होते! त्यामुळे पहिलाच गणपती आम्ही बागेतील माती चाळून त्या मातीचा बनविला! स्वतःच्या हातून साकारलेल्या त्या ओबडधोबड मूर्तीची प्रेमाने केलेली प्राणप्रतिष्ठा पाहून आम्ही भारावून गेलो.

बागेतच या मूर्तीचे विसर्जनही झाले. गणपती बुद्धीची देवता! त्यामुळे दरवर्षी डोके लढवून प्रत्येक गणपतीत काहीतरी नावीन्य आणायचे आम्ही ठरवले. पुढील वर्षी आम्ही आमच्या साठवलेल्या खजिन्याचा – अर्थात समुद्राकाठी गोळा केलेल्या शंख-शिंपल्यांचा गणपती बनविण्यासाठी वापर केला. यात शंख-शिंपल्यांबरोबरच कवड्या, समुद्राकाठची वाळू यांचाही समावेश होता. हा गणपती सगळ्यांना खूपच आवडला.

दरवर्षी नवीन प्रकारचा पर्यावरणपूरक गणपती करणे हे खरंच मोठे आव्हान होते. त्यानंतर आम्ही काडेपेटीतील काड्या कार्डपेपरवर चिटकवून, लाल-पिवळे दोरे कार्डबोर्डवर चिटकवून वेगवेगळे गणपती बनविले. मग वेगवेगळ्या डाळींचा वापर करून, तांदूळ व कडधान्यांचा वापर करून विविध गणपती तयार केले. पेपर क्विलिंगचा गणपती तर फारच मनमोहक झाला. त्यासाठी मी पेपर क्विलिंगची कला शिकून घेतली. यानंतर आम्ही शाडूच्या मातीचे गणपती शिकायचे ठरवले. शाडूची माती घरी आणून, मळून त्याचा गणपती बनविणे, तो रंगविणे म्हणजे चिकाटीचे काम! हळूहळू त्यावरही हात बसला. पुढे शाळेतील मुलांसाठी शाडूचे गणपती बनविण्याची कार्यशाळादेखील आम्ही घेतली.

कसला गणपती करायचा याचे नियोजन, पूर्वतयारी हे सगळे धरून प्रत्येक गणपती बनवायला जवळपास 2 ते 3 दिवस लागायचे. 4-5 तास सलग बसून काम करावे लागायचे, एकाग्रतेचा कस लागायचा. कधी हात-पाय-पाठ भरून यायची; पण गणपती तयार झाल्यानंतरचा आनंद अवर्णनीय असायचा! या गणपतींचे विसर्जन करावेसे वाटायचे नाही! कित्येक गणपती आम्ही बरेच दिवस तसेच जतन करून ठेवले. आमची गणपतीची आरासदेखील पर्यावरणपूरक असायची. सजावटीसाठी आम्ही फुलझाडांच्या/शोभेच्या झाडांच्या कुंड्या, फळे, बिया, पाम झाडाच्या झावळ्या, घरी केलेल्या कागदी झुरमुळ्या, डबीत तरारून आलेले गव्हांकूर, वापरलेल्या/खराब झालेल्या सी.डी. यांचा वापर करत असू. आई-वडिलांचा पाठिंबा, त्यांचा सजावटीतील सहभाग आणि इतरांनी दिलेली कौतुकाची थाप यामुळे आमचा उत्साह दरवर्षी वाढतो, नव्या जोमाने आम्ही कामाला लागतो आणि एक नवीन प्रकारचा पर्यावरणपूरक गणपती साकारतो. या अनोख्या उपक्रमाद्वारे विद्या आणि कलांचा दाता असणारा गणपती बाप्पा आमच्यातला कलाकार घडवतो!

– डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत

Leave A Reply

Your email address will not be published.