अमृतसर – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे पंजाबच्या इलेक्शन दौऱ्यावर आले असून त्यांनी आज येथे पक्ष संघटना मजबुतीसाठी बैठक घेतली. यावेळी माजी आयपीएस अधिकारी कुवॅंर विजयप्रताप सिंह यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला.
या नंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की पंजाबात आम्ही आमचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार शीख समाजाचा देणार आहोत. आम्ही असा चेहरा देऊ की त्यातून सर्वांनाच समाधान वाटेल. आम्ही जेव्हा या विषयी निर्णय घेऊ त्यावेळी लगेच तुम्हाला माहिती देऊ असे सांगून याविषयी जादा तपशील देण्याचे त्यांनी टाळले.
आपली नवज्योत सिद्धू यांच्याशी चर्चा झाली आहे काय असे विचारता केजरीवाल म्हणाले की सिद्धू हे कॉंग्रेसचे नेते आहेत आणि ते अत्यंत सन्माननीय नेते असल्याने त्यांच्या विषयी मी काहीही भाष्य करणे योग्य ठरणार नाही.
आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार दलित समाजाचा असेल काय असे विचारता ते म्हणाले की, आमचा उमेदवार शीख समाजाचा असेल आणि संपूर्ण पंजाबला त्याचा अभिमान वाटेल. आपले नवज्योत सिद्धू यांच्याशी काही बोलणे झाले आहे का असे विचारता ते म्हणाले की त्यांच्या संबंधात जर काही घडले तर तातडीने पत्रकारांना पहिल्यांदा कळवले जाईल.