स्टेट बॅंकेचा व्यवहार सुरक्षित करण्यासाठी पुढाकार
पुणे – स्टेट बॅंकेच्या एटीएममधून रक्कम काढताना आता अधिक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. रक्कम काढताना ग्राहकाला “ओटीपी’ मिळणार आहे. ही व्यवस्था 1 जानेवारीपासून लागू करण्यात आल्याचे भारतातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने ट्विटरवर जाहीर केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, एटीएममधून पैसे काढण्याच्या पद्धतीत फारसा बदल करण्यात आलेला नाही. फक्त वन टाइम पासवर्ड म्हणजे “ओटीपी’ व्यवस्था अतिरीक्त लागू करण्यात आली आहे. अनाधिकृत व्यवहार रोखण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे. ही सेवा सायंकाळी 8 पासून सकाळी 8 वाजेपर्यंत कार्यरत आहे.
मात्र “ओटीपी’आधारित रक्कम काढण्याची सुविधा सध्या तरी 10 हजार रुपयांवरील व्यवहारासाठी लागू होणार आहे. त्याचबरोबर ही सुविधा फक्त स्टेट बॅंकेच्या एटीएममध्येच उपलब्ध असेल. कारण ही व्यवस्था आणखी राष्ट्रीय फायनान्सियल स्वीच म्हणजे “एनएफएस’वर उपलब्ध करण्यात आलेली नाही. हा व्यवहार करताना ग्राहकाला ओटीपी बॅंकेकडे नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावर उपलब्ध होईल. ग्राहकाने पैसे काढताना रक्कमेचा आकडा भरल्यानंतर एटीएमच्या स्क्रीनवर “ओटीपी’ संबंधी बॉक्स दिसेल.
त्यामध्ये मोबाइल क्रमांकावरील “ओटीपी’ भरल्यानंतर व्यवहार पूर्ण होईल. एटीएम व्यवहार जास्तीत जास्त सुरक्षित व्हावेत, याकरिता बॅंक निरंतर प्रयत्न करीत आहे. याचाच भाग म्हणून सध्या ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे. यामुळे अनधिकृत व्यवहाराला पायबंद बसेल अशी आशा स्टेट बॅंकेने व्यक्त केली आहे.