स्टेट बॅंकेच्या एटीएम व्यवहारावेळी ओटीपी पद्धत

नवी दिल्ली – भारतातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने ग्राहकांना एटीएममधून व्यवहार करताना सुरक्षितता मिळावी याकरिता वनटाइम पासवर्ड पद्धत लागू केली आहे. ही पद्धत 18 सप्टेंबरपासून अंमलात येणार आहे.

जे ग्राहक एटीएममधून 10 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्‍कम काढतील त्यांना ओटीपी पद्धतीने सुरक्षितता मिळणार आहे. विशेष म्हणजे अशी पद्धत वर्षाचे 24 तास उपलब्ध करण्यात येत असल्याचे स्टेट बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सी. एस. शेट्टी यांनी सांगितले. स्टेट बॅंकेने जानेवारी महिन्यापासूनच 10 हजार रुपयांवरील रक्‍कम काढण्यासाठी ओटीपी पद्धत लागू केली होती. मात्र, ही पद्धत फक्‍त रात्री 8 ते सकाळी 8 दरम्यान चालू होती.

आता दिवसाचे 24 तास अशा पद्धतीने व्यवहार करण्याची सुविधा स्टेट बॅंकेने आपल्या ग्राहकांना उपलब्ध केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एटीएमच्या माध्यमातून गैरव्यवहार होत असल्याचे प्रकार घडत आहेत. आता ह्या पद्धतीमुळे असे गैरव्यवहार थांबतील. 

ओटीपीबरोबरच पिन क्रमांक वापरला जाणार आहे. त्यामुळे गैरव्यवहार होण्याची शक्‍यता कमी झाली असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. मात्र फक्‍त स्टेट बॅंकेच्या एटीएममध्येच ही सेवा उपलब्ध असणार आहे. इतर बॅंकांच्या एटीएममध्ये ही पद्धत विकसित करण्यात आलेली नाही. बॅंकेच्या ग्राहकांनी मोबाइल क्रमांकाचे नोंदणी करावी. 

Leave A Reply

Your email address will not be published.