संजय राठोड यांचा 1 मार्चपर्यंत राजीनामा घ्या; चंद्रकांत पाटलांचा अल्टीमेटम

कोल्हापूर  – पूजा चव्हाण प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचा सोमवार 1 मार्चपर्यंत राजीनामा घ्यावा. अन्यथा विधीमंडळाच्या सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही. संपूर्ण राज्यभर आंदोलनाचे रान उठवू’असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीतील 6 मंत्र्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाच्या तक्रारी असताना त्यांच्यावर कुठल्याही स्वरुपाची कारवाई होत नाही. स्वत:ला सत्यवादी समजणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार याप्रकरणी आतापर्यंत गप्प का बसलेत ? असा सवालही पाटील यांनी केला. ते शनिवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

पूजा चव्हाण प्रकरणी भाजपच्या चित्रा वाघ सातत्याने आवाज उठवित असल्यामुळे सरकारने त्यांच्या पतीवर कारवाई सुरू केली आहे. हे सरकार दडपशाहीने कामकाज करत आहे. हा प्रकार बिलकुल खपवून घेतला जाणार नाही. भाजप कार्यकर्त्यांना त्रास देऊन घाबरवण्याचा प्रकार सहन करणार नाही. सरकारला तोंड उघडू देणार नाही असेही ते म्हणाले.

पूजा चव्हाण यांची हत्या की आत्महत्या या प्रकरणी सरकार अजून प्रकाशझोत टाकू शकले नाही. चव्हाण या मूळच्या बीडच्या असताना त्यांचा यवतमाळमध्ये गर्भपात कसा ? घटना घडली त्यावेळी उपस्थित असणारे ते दोघे कुठे गायब झाले आहेत? कुणाच्या सांगण्यावरुन गायब झाले ? डॉ. रोहिदास चव्हाण कुठे आहेत ? पोस्टमार्टम अहवाल कुठे आहे या साऱ्याचा सरकारने उलगडा करावा अशी मागणी पाटील यांनी केली.

करोना कालावधीतील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार
“शेतकऱ्यांची कर्जमाफी, प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, वीज बिलाचा प्रश्न, पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अशा विविध विषयावर सभागृहाला सरकारला घेरू. करोनाच्या कालावधीत झालेल्या वैद्यकीय साहित्य खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. सभागृहात त्याचा पर्दाफाश करू. मराठा आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकारला गांभीर्य नाही. भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले की मराठा समाजाला योग्यपणे अभ्यास करुन टिकणारे आरक्षण देऊ.’अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.