… अन्यथा आरोग्य विभागात सोडणार डुकरे

विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा इशारा : शहरात वाढते आजार

पिंपरी – शहरात डेंग्यू, चिकुनगुणिया, मलेरिया आदी रोगांची साथ नियंत्रणात राहावी, यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडून नियमित औषध फवारणी, औष्णिक धुरीकरण होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचप्रमाणे शहरात भटकी कुत्री आणि डुकरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील भटकी कुत्री व डुकरे पकडण्याची मोहीम तीव्र करण्यात यावी. अन्यथा आरोग्य विभागात मोकाट डुकरे सोडण्यात येतील, असा इशारा विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी दिला आहे.

त्यांनी याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. पत्रात त्यांनी म्हटले आहे की, शहरामध्ये हवामानातील सततच्या बदलामुळे डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया आदी आजारांना पोषक वातावरण तयार होऊन या रोगांचे रूग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना महागडे वैद्यकीय उपचार घ्यावे लागत आहेत. या रोगांची साथ नियंत्रणात राहावी, यासाठी डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने घरे, दुकानाच्या आसपासच्या परिसराची तपासणी आरोग्य विभागामार्फत नियमित होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून त्यावर प्रतिधांत्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच डेंग्यू, चिकनगुनिया व मलेरिया या रोगांसाठी आवश्‍यक प्रतिबंधक गोळ्या, लस महापालिकेच्या दवाखान्यात पुरेसे उपलब्ध करून देण्यात यावे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सध्या नियमित औषध फवारणी, औष्णिक धुरीकरण होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच, जंतूनाशक औषधेही वेळेवर उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे औषधफवारणी करण्यावर मर्यादा येत आहेत. महापालिका प्रशासनाने प्रत्येक प्रभागात औषध फवारणीची किती औषधे गेल्या सहा महिन्यांत पुरविली, किती खरेदी केली याची सविस्तर माहिती देण्यात यावी.

त्याचप्रमाणे शहरात भटकी कुत्री आणि डुकरांची संख्या वाढलेली आहे. महापालिका प्रशासनाकडून याबाबत केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम सुरू आहे. प्रत्यक्षात कार्यवाही काहीच केली जात नाही. पर्यायाने, नागरिकांना भटक्‍या कुत्र्यांचा व डुकरांचा उपद्रव सहन करावा लागत आहे, असे सांगत विरोधी पक्ष नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आरोग्य विभागात डुकरे सोडण्यात येतील, असा इशारा देखील पालिका प्रशासनाला दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.