…अन्यथा परवानाधारक रस्त्यावर उतरतील

कराड  – कराड तालुक्‍यात व शहरात सुरू असलेली बेकायदा वाहतूक त्वरीत बंद करावी यासाठी अनेकदा निवेदने देऊन, बंद पुकारून बेकायदेशीर वाहनांचे चित्रीकरण करून, पोलीस अधिकारी व परिवहन अधिकारी यांना पुरावे देऊनही केवळ जुजबी कारवाई करून संघटनेच्या तोंडाला पाने पुसली जातात. आता बेकायदेशीर वाहतूक बंद न झाल्यास परवानाधारक रिक्षा व्यावसायिक कायदा हातात घेतील, असा इशारा कृष्णा कराड तालुका रिक्षाचालक-मालक संघटना संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत देण्यात आले.

कराड तालुक्‍यात अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या परवानाधारक वाहनांपेक्षा अधिक आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. केवळ पोलिसांना व अन्य यंत्रणेला हप्ते देऊन बेकायदेशीर वडाप वाहतूक केली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पोलीस अथवा परिवहन विभागाचे कसलेही त्यावर नियंत्रण नाही. त्यामुळे परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

परवानाधारक रिक्षा चालक यांनी बॅंकांची कर्जे काढून हा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र व्यवसाय होत नसल्यामुळे त्यांच्यापुढे मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अवैध वाहतूक बंद करण्यासाठी प्रसंगी व्यावसायिकांना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा तालुकाध्यक्ष गफार नदाफ यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांच्यसोबत झालेल्या बैठकीत दिला.

तसेच परवानाधारक गाड्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर लावून आमचेही परमिट खाली करून द्या व आम्हाला खासगी परवाना द्या अशी मागणी केली. कराड तालुक्‍यात अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षा, जीप, मॅक्‍झिमो यांचे नंबर परिवहन अधिकाऱ्यांना लिखित स्वरूपात दिले असून अन्य वाहनेही मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

याशिवाय रिक्षा व्यावसायिकांना कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, ऑटो रिक्षाचे इन्शुरन्स दर कमी करावेत या मागण्या करण्यात आल्या आहेत. संघटनेच्यावतीने विकास पाटील, विजय लोखंडे, भागवत गरुड, विलास कारंडे यांनी निवेदन दिलेव कारवाईची मागणी केली. अन्यथा आम्ही आता रस्त्यावर उतरू असा इशाराही दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.