…अन्यथा शहर कचऱ्यात जाईल!

विविध क्षेत्रातील मान्यवरांची भीती ः आयुक्तांनी “धृतराष्ट्राची’ भूमिका सोडावी

शहरच कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली – चिंचवडे

पिंपरी-चिंचवड कामगारनगरीत कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. या समस्येने रौद्र रूप धारण केले आहे. शहरांमधील कचरा हा गुंतागुंतीचा आणि गंभीर प्रश्‍न बनत चालला आहे. कचरा समस्येने सगळेच नागरिक हैराण आहेत. कचरा व्यवस्थापन नीट होत नसल्याने संपूर्ण शहर कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली आले असल्याचे मत शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी यावेळी व्यक्त केले. कचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेचे प्रयत्न तसेच नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी – महापालिका कचरा व्यवस्थापनावर वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, त्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन होत नाही. आयुक्तांनी धृतराष्ट्राची भूमिका सोडावी, अन्यथा शहराचा कचरा होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज (गुरुवारी) चिंचवड येथे व्यक्त केली. शहराचे पालक म्हणून आयुक्तांनी या प्रश्‍नी जातीने लक्ष घालण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

गेली काही दिवस पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा प्रश्‍न गाजत आहे. कचरा व्यवस्थापनात महापालिका कुठे कमी पडते का, याचा शोध आणि बोध घेता यावा यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा समस्या आणि व्यवस्थापन या विषयावर शहर शिवसेनेच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर सभागृहात नागरिकांचे चर्चासत्र घेण्यात आले. शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, शहर प्रमुख योगेश बाबर, महिला शहर संघटिका उर्मिला काळभोर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे, लोकशाही बचाव समितीचे समन्वयक मानव कांबळे, डॉ. वैशाली गोरडे, जितेंद्र निखळ, किरण येवलेकर, सुहास जोशी, कष्टकरी पंचायतीचे काशिनाथ नखाते, युवा सेनेचे शहर प्रमुख जितेंद्र ननावरे, विवेक तितरमाडे, अनिल कांबळे, जिल्हा विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य संतोष सौंदणकर, अनिता तुतारे, सरिता साने, बाळासाहेब वाल्हेकर आदी उपस्थित होते.

मानव कांबळे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड सारख्या स्मार्ट सिटीमध्ये कचऱ्याची समस्या निर्माण व्हावी ही मोठी दुर्देवाची बाब आहे. महापालिकेचे कचरा संकलन करणारे ठेकेदार शहराच्या एकूण रचनेप्रमाणे कचऱ्याच्या गाड्या उपलब्ध करू शकले नाहीत. प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविताना आधी एका ठेकेदाराला काम दिले. नंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या सोयीच्या नवीन ठेकेदारास टेंडर दिले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल रॉय म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून कचरा समस्या शहरातील गंभीर समस्या बनली आहे. त्यावर तोडगा काढण्याचे महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. कचरा व्यवस्थापन करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात याची माहिती डॉ. रॉय यांनी चर्चासत्रात दिली. शिवसेनेच्या वतीने या चर्चासत्रास उपस्थित नागरिकांकडून कचरा समस्येबाबत तक्रारी मागविल्या होत्या. यावेळी विविध भागातील कचऱ्याशी संबंधित सुमारे दीडशेहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. शिवसेनेच्या माध्यमातून तक्रारी प्रभागनिहाय सोडविल्या जाणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)