…अन्यथा पुण्यात पुन्हा लॉकडाऊन; विभागीय आयुक्तांचे संकेत

आवश्‍यकता भासल्यास दुकाने बंद करा : विभागीय आयुक्‍त

पुणे – करोना बाधितांची संख्या अशीच वाढत राहिल्यास परिस्थिती गंभीर स्वरुप धारण करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउनसारख्या कडक उपाययोजना अंमलात आणण्याच्या शक्‍यता नाकारता येत नाहीत. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश विभागीय आयुक्‍तांनी दिले आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी, मंगल कार्यालये, सांस्कृतिक सभागृहे आदी ठिकाणी संख्येवर निर्बंध, सामाजिक अंतर, मास्कचा वापर आदी सूचनांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच या नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई आणि आवश्‍यकता भासल्यास दुकाने बंद करण्याची कारवाई करण्यात यावी, असे आदेश विभागीय आयुक्त यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.

मिशन बिगिन अगेनअंतर्गत वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार विविध दुकाने व उपक्रम सुरू करण्यासाठी अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी देण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत अनेक ठिकाणी नागरिकांकडून या आदेशातील अटी व शर्तीचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यावर प्रशासनाने पुन्हा कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

असे आहेत आदेश
राजकीय सभा, मोर्चे, मिरवणुका, संमेलने, लग्नसमारंभ आदी प्रसंगी मर्यादित संख्या असावी.
क्‍लासेच्या ठिकाणी मास्क तसेच विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवणे ही जबाबदारी संबधित कोचिंग क्‍लासेस प्रमुखांनी घ्यावी
सर्व खासगी डॉक्‍टर यांनी त्यांच्याकडे तपासणीसाठी आलेल्या सर्दी, खोकला तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांना करोना चाचणीची तपासणी अनिवार्य करावी.
तपासणीमध्ये पॉझिटिव्ह व्यक्‍तींना अलगीकरण करणे बंधनकारक करावे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.