मुंबई – बलात्काराच्या आरोपामुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडले असताना भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे नेते मनिष धुरी यांनी रेणु शर्माविरोधात गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाला आज आश्चर्यकारक कलाटणी मिळाली आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सावध भूमिका घेण्यात आली आहे.
कृष्णा हेगडे यांनी मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणू शर्माविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.2010 सालापासून रेणू शर्मा मला त्रास देत होती. वेगवेगळया फोन नंबरवरुन ती माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती.
मी तिला प्रत्येकवेळी टाळत होतो. रेणू शर्मा माझ्या मागे लागली होती. तिला माझ्यासोबत संबंध प्रस्थापित करायते होते. ती मला हनी ट्रॅपच्या जाळयात अडकवण्याचा प्रयत्न करत होती असा आरोप कृष्णा हेगडे यांनी केला आहे.
रेणू शर्मा माझ्या मागे लागली होती. तेव्हा, मी माझ्या काही परिचयाच्या माणसांकडून तिची माहिती काढली. तेव्हा, रेणू शर्मा फसवणूक करते, हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवत असल्याची मला माहिती मिळाली असे कृष्णा हेगडे यांनी सांगितले.
त्याचवेळी मनसेच्या मनिष धुरी यांच्यासोबतही असाच प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत धुरी यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. धुरी म्हणाले, रेणू शर्माने माझ्याशी संपर्क साधला होता. ती मला फॉलो करत होती.
त्यावेळी मी मनसेचा विभाग अध्यक्ष होतो. तिने माझ्याशी जवळीक साधण्याचे प्रयत्न केले. तिला व्हिडीओ अल्बम काढायचा होता. त्यासाठी तिच्याकडून ब्लॅकमेलिंग सुरू होते. तिचा हेतू लक्षात आल्यावर मी पिच्छा सोडवून घेतला. अन्यथा त्यावेळी माझाही धनंजय मुंडे झाला असता,’ असा दावा धुरी यांनी केला.
तुम्ही त्यावेळी रेणू शर्माविरोधात पोलिसात तक्रार का दाखल केली नाही, असा प्रश्न धुरी यांना विचारण्यात आला. महिलेची बदनामी नको म्हणून त्यावेळी मी शांत बसलो. मी त्या महिलेपासून पिच्छा सोडवला होता. त्यामुळे मी शांत राहिलो. पोलिसात तक्रार दाखल केली नाही.
त्यानंतर मग तिचा आणि माझा संपर्क आला नाही. कदाचित त्यावेळी ती कृष्णा हेगडे किंवा इतर नेत्यांच्या संपर्कात असावी. 2018-19 मध्ये तिने पुन्हा माझ्याशी संपर्क साधला. पण तिचा हेतू माहीत असल्याने मी तिला टाळले’ असे धुरींनी सांगितले.