Jayant Patil – राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच नवनवीन योजनांची फक्त घोषणा केली जात आहे. पण योजना पूर्ण करण्यासाठी निधी नसल्यानेच आता रिझर्व्ह बॅंकेकडे सव्वालाख कोटीचे कर्ज मागितले आहे.
त्यामुळेच निवडणुका लवकर लागल्या पाहिजे अन्यथा महाराष्ट्रावर नऊ लाख कोटींचे कर्ज होईल आणि ते आपणास परवडणारे नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार घालवा आणि सर्वसामान्यांचे सरकार आणा, असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.
सावंतवाडीत शिवस्वराज्य यात्रेनिमित्त शनिवारी जाहीर सभेत जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर चौफेर टीका केली. यावेळी खासदार डाॅ. अमोल कोल्हे, युवक अध्यक्ष सुनिल गव्हाणे, माजी मंत्री प्रविण भोसले, आदी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, आतापर्यंतच्या इतिहासात विद्यमान सरकारमध्ये चालला तसा भष्ट्राचार जनतेने कधीच पाहिला नव्हता. इव्हेंटचे सरकार झाले आहे. लाडकी बहीण योजना आणली, पण बहीण सुरक्षित राहिली तरच योजना चालणार पण सांगणार कोण? महिला सुरक्षा महत्त्वाची आहे.
फक्त राज्यावर कर्जाचा डोंगर उभा राहात आहे, आता नव्या योजनांसाठी सव्वालाख कोटींचे कर्ज मागितले आहे. त्यामुळे निवडणुका लवकर झाल्या पाहिजेत कर्ज, घ्यायचे तरी बंद करतील, नाहीतर राज्यावर नऊ लाख कोटींचे कर्ज होईल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली.
यावेळी दिपक केसरकर यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, दिवाळी आली तरी शालेय विद्यार्थ्यांना गणवेश नाही, यांना फक्त लाडका काॅन्ट्रक्टर हवा आहे. पण मुलांचे गणवेश नको. आपल्या मतदारसंघात पंधरा वर्षांपूर्वी ज्या घोषणा केल्या त्या आजही पूर्ण झाल्या नाहीत.