नवी दिल्ली : आयुष्यातील अडचणींवर मात करत अनेकांनी यश संपादन केले आहे. असेच यश एका युवतीने मिळवले आहे. पण ते यश तिने आपल्या अडचणींना झुगारून ज्ञानाच्या जोरावर मिळवले आहे. तुमच्यापेक्षा इतरांचे दुःख मोठे असते, हा दृष्टिकोन ठेवला तर आयुष्य सोपं वाटेल, या तत्त्वावर विश्वास ठेवणाऱ्या कोलकात्याच्या नेहा बॅनर्जीने 2019 च्या युपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 20 वा क्रमांक मिळवला होता.
मूळची कोलकात्याची असलेली नेहा बॅनर्जी 2019 च्या तुकडीची आयएएस अधिकारी आहे. अभ्यासात हुशार असणाऱ्या नेहाने नोकरी करताकरता लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच फटक्यात यश मिळवले. नोकरी करत तयारी करूनही तिने पहिल्याच प्रयत्नात तिने ही परीक्षा उत्तीर्ण केली. मुलाखतीत तिला विचारलेल्या एका अवघड प्रश्नाला तिने दिलेल्या संतुलित उत्तराने तिचे ध्येय सहज साध्य झाले. बुद्धिमत्ता आणि उच्च विचारांच्या आधारावर हे यश मिळवणाऱ्या नेहाचा हा प्रवास इतरांसाठी आदर्शवत ठरणारा आहे.
2011 मध्ये तिच्या वडीलांचे निधन झाले. या आघाताने खचून न जाता तिच्या आईने एकटीनेच तिला वाढवले. अभ्यासात हुशार असणाऱ्या नेहाने आईच्या कष्टाचे चीज करत, 2018 मध्ये आयआयटी खरगपूर इथून इंजिनीअरिंग पूर्ण केले आणि नोएडातील एका कंपनीत नोकरीही मिळवली. नोकरी करत असतानाच तिने यूपीएससी अर्थात लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा विचार केला. नोकरी करतच तिने या परीक्षेची तयारी केली आणि मुलाखतीच्या 15 दिवस आधी नोकरीचा राजीनामा दिला. मुलाखतीसाठी देखील तिने स्वतःच तयारी केली होती. त्यामुळेच कदाचित ती मुलाखतीत अत्यंत आत्मविश्वासाने उत्तरे देऊ शकली. नेहाने मिळवलेले यश देशातील सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.