नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून १२८ पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात राज्यातील दहा जणांचा समावेश आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘टाटा’सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन आणि ‘पूनावाला उद्योग समूहा’चे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे पुत्र म्हणजेच अदर पूनावाला यांनी स्वत:च्या बालपणीचा एक फोटो पोस्ट करत आपल्या भावाना व्यक्त केल्या आहेत.
सायरस पूनावालांबरोबरच सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सायरस यांचे पुत्र अदर पुनावाला यांनी ट्विटरवरुन आपल्या भावाना व्यक्त केल्यात. “या वर्षी पद्म पुरस्कार मिळवणाऱ्या सर्व व्यक्तींचं मी मनापासून अभिनंदन करतो,” असे अदर पूनावाला यांनी ट्विटच्या सुरुवातील म्हटले आहे. सर्व १२८ पुरस्कार विजेते हो खरोखरच पुरस्कारासाठी पात्र आहेत, असा उल्लेखही त्यांनी ट्विटमध्ये केला आहे. वडीलांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अदर पुनावाला यांनी आनंद व्यक्त करताना सरकारचेही आभार मानले आहेत.
My heartiest congratulations to all the deserving individuals who will receive the Padma awards this year. I thank the government of India for acknowledging my mentor, my hero, my father, Dr. Cyrus Poonawalla. pic.twitter.com/kOv7QtCtA9
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) January 25, 2022
“मी भारत सरकारचे आभार मानू इच्छितो. त्यांनी माझे मार्गदर्शक, माझे हिरो, माझे वडील डॉक्टर सायरस पूनावाला यांच्या कामाची दखल घेतली,” असं अदर पूनावाला म्हणाले आहेत. या ट्विटसोबत अदर पूनावाला यांनी एक जुना फोटो ट्विट केला आहे. यामध्ये अदर हे अगदीच एक दीड वर्षांचे असल्याचं दिसत आहे. फोटोमध्ये विलू सायरस पूनावाला यांच्या कुशीत असणारा चिमुकला मुलगाच अदर पुनावाला आहेत.