दुष्काळाचा फटका : दि.8 जूनपासून दरवाढ लागू होणार
पुणे – राज्यात घटत असलेले रोजचे दूधसंकलन, गाईच्या दुधाच्या दरात एक जूनपासून करण्यात आलेली वाढ आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी दि.8 जूनपासून “कात्रज’ वगळता इतर दूध दरात 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याबरोबरच 44 रुपये किंमतीपेक्षा जादा दरवाढ करू नये, असा निर्धारही या बैठकीत करण्यात आला आहे. या निर्णयामुळे केवळ कात्रजचा गायीच्या दुधाचा दर 42 रुपये राहणार आहे. त्याचवेळी इतर दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिकांच्या उत्पादनाचा दर 44 रुपये इतका राहणार आहे.
राज्यात सहकारी आणि खासगी दूध संघांचा मिळून दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ स्थापन झाला आहे. सद्यस्थितील राज्यातील 170 दूध प्रकल्प या संस्थेचे सभासद आहेत. दुधाच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारबरोबर चर्चा, वाटाघाटी करण्यासाठी संघाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यात सध्या दुधाचे रोजचे संकलन दुष्काळी स्थिती आणि पाण्याची टंचाई यामुळे घटत आहे. चाऱ्याचा प्रश्न बिकट होत असताना राज्य सरकारचे दूध अनुदानही बंद झाले आहे. त्यामुळे तातडीने शासनाने पुढील तीन महिन्यांकरिता प्रतिलिटर 25 अधिक 5 रुपये अनुदान द्यावे, तसेच गाईच्या दुधास प्रतिलिटर 30 रुपये दर शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे
दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाची सभा मंगळवारी अध्यक्ष विनायक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ येथे झाली. या सभेस उपाध्यक्ष गोपाळराव म्हस्के, पुणे जिल्हा संघाचे चेअरमन विष्णू हिंगे, ऊर्जा दूध संघाचे प्रकाश कुतवळ, सोनाईचे दशरथ माने, सोलापूर दूध संघाचे राजे भोसले, शिवामृतचे धैर्यशील मोहिते पाटील आदी उपस्थित होते.
“कात्रज’बाबत 25 जूनला निर्णय
पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ कात्रजच्या दूध दरात 8 जूनपासून कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही, असे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी सांगितले. ते म्हणाले, संघाच्या संचालक मंडळाने दरवाढ करण्याबाबत बैठक बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार या दराबाबत 25 जूनच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.