कारगिल युद्धाच्या वेळी अन्य देशांनी भारताला लुटले

माजी लष्करप्रमुख व्ही.पी.मलिक यांचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली : दोन दशकांपूर्वी लढल्या गेलेल्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. पण या युद्धाच्याकाळात इतर देशांनी आपल्या परिस्थितीचा फायदा करून घेत देशाला लुटले, असा गौप्यस्फोट माजी लष्करप्रमुख व्ही.पी. मलिक यांनी एका कार्यक्रमामध्ये केला आहे. त्यावेळी शत्रुच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला उपग्रहांचे फोटो, शस्त्रास्त्र आणि दारु गोळ्याची तात्काळ गरज होती. त्यावेळी या सर्व साहित्यासाठी आपल्याला जास्त पैसे मोजावे लागले.

एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली. कारगिल युद्धकाळात काही गोष्टी आपल्याला तात्काळ खरेदी कराव्या लागणार होत्या. त्यावेळी देश कुठलाही असो, त्यांनी शक्‍य तितका आपल्या परिस्थितीचा फायदा उचलला. आपण एका देशाकडे बंदुकांसाठी संपर्क साधला होता. त्यांनी बंदुका देण्याचे आश्वासन दिले पण आपल्याला जुन्या वापरलेल्या बंदुका दिल्या. आपल्याकडे दारुगोळा नव्हता. एका देशाकडे दारुगोळ्याची मागणी केली, तेव्हा त्यांनी 1970 च्या दशकातील दारुगोळा आपल्याला दिला.मेक इन इंडिया अँड नेशन्स सिक्‍युरिटी कार्यक्रमाच्या पॅनल चर्चेमध्ये व्ही.पी. मलिक यांनी हा खुलासा केला.

इतकेच नव्हे तर, कारगिल युद्धाच्यावेळी आपण जे सॅटेलाइट फोटो खरेदी केले. त्या प्रत्येक फोटोसाठी आपल्याला 36 हजार रुपये मोजावे लागले. ते फोटो सुद्धा लेटेस्ट नव्हते. तीन वर्षआधी काढलेले ते फोटो होते, असे मलिक म्हणाले. कारगिल युद्धाच्यावेळी जनरल मलिक भारताचे लष्करप्रमुख होते. सार्वजनिक क्षेत्राकडून आवश्‍यक शस्त्रास्त्रे मिळत नाहीत त्यामुळेच भारतीय लष्कराला शस्त्रास्त्रांची आयात करावी लागते असे मलिक म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.